सिलिंडर देणाऱ्यास विचारा लस घेतली का ? शहरातील ६८ डिलिव्हरी बॉयना लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:12+5:302021-06-01T04:22:12+5:30
गोंदिया : गॅस सिलिंडर ही आता जवळपास सर्वांची अत्यावश्यक गरज आहे. गॅस सिलिंडरशिवाय स्वयंपाक घराची कल्पनाच करता येत नाही. ...
गोंदिया : गॅस सिलिंडर ही आता जवळपास सर्वांची अत्यावश्यक गरज आहे. गॅस सिलिंडरशिवाय स्वयंपाक घराची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गॅस सिलिंडरच्या सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग काळातसुद्धा ग्राहकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविण्याचे काम डिलिव्हरी बॉयने केले. कोरोना संसर्गाचा धोका पत्करून डिलिव्हरी बॉय ग्राहकांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे गॅस सिलिंडर पाेहोचवून देण्याचे काम करीत होते. गोंदिया शहरात पाच गॅस एजन्सी असून ६८ हजार गॅस सिलिंडरधारक ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना बुकींग केल्यानंतर २४ तासांच्या आत डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविला जातो. एकप्रकारे हे डिलिव्हरी बॉयसुद्धा फ्रंट लाईन वर्कर्सप्रमाणे मागील दीड वर्षापासून ग्राहकांना अवरितपणे सेवा देत आहेत. पण त्यांच्या सुरक्षेकडे किंवा त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याकडे कंपन्यांनीही लक्ष दिले नव्हते. मात्र, उशीरा का होईना कंपन्यांनी याची दखल घेत डिलिव्हरी बॉयला लसीकरण करण्यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांशी करार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती विविध गॅस एजन्सीच्या संचालकांनी दिली.
..........
सिलिंडर सॅनिटाईज केले का?
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडूनच पुरवठा करताना गॅस सिलिंडरचे सॅनिटायझेशन केले जाते. तर स्थानिक गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडरची पोच देताना ते सॅनिटाईज करून दिले जात नसल्याची माहिती आहे. शहरातील ग्राहकांनी सुध्दा याला दुजोरा दिला आहे.
........
एकही डिलिव्हरी बाॅय पॉझिटिव्ह नाही
जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मात्र, या ही कालावधीत ग्राहकांना अविरतपणे गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. गोंदिया शहरात पाच गॅस एजन्सी असून त्यांच्याकडे ६८ डिलिव्हरी बॉय कार्यरत आहेत. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्याने एकही डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह आला नाही.
........
डिलिव्हरी बॉय म्हणातात....
मागील दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मात्र, अशा परिस्थितीतही सर्व ग्राहकांना नियमित गॅस सिलिंडरचा पुरवठा आम्ही घरपोच केला. आम्ही सुध्दा फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे काम केले. त्यामुळे आम्हांला प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची गरज होती. मात्र, याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही.
- राजू डिलिव्हरी बॉय
................
कोरोना संकट काळात धोका पत्करून ग्राहकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची गरज होती. मात्र, कंपन्यांना आता उशिरा का होईना याची जाणीव झाली असून येत्या दोन-तीन दिवसांत लसीकरण करण्यात येणार असे सांगितले जात आहे.
-प्रमोद डिलिव्हरी बॉय
................
जबाबदारी कोणाची ?
ग्राहकांच्या घरापर्यंत सुरक्षित गॅस सिलिंडर पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित गॅस कंपन्यांची आहे. त्यांच्याकडे असलेल्या कर्मचारी आणि डिलिव्हरी बाॅयला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची जबाबदारी ही त्या कंपन्यांचीच आहे. - देविदास वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
........
शहरातील एकूण घरगुती ग्राहक : ६८२४५
शहरातील गॅस एजन्सींची संख्या : ०५
घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी : ६८
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस : ००
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस : ००
एकही डोस न घेतलेले कर्मचारी : ६८