तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 11:31 AM2023-07-08T11:31:57+5:302023-07-08T11:33:16+5:30
गंगाझरी पोलिसांची कारवाई
गोंदिया : चेष्टा करताना दिलेली शिवीगाळ ही शेजारच्या व्यक्तीने आपल्याला दिली असे वाटले. त्यातून झालेल्या वादात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना ६ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजता शहारवानी येथे घडली. विशाल गणेश ताराम (२५), रा. लेंडझरी असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे.
गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शहारवानी येथील सोयब मुन्नालाल पुराम (३१) व विशाल गणेश ताराम (२५) रा. लेंडझरी, ता. गोरेगाव, हे दोघे जण शहारवाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेजारील एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी विशाल ताराम याचे दोन ते तीन मित्र त्या ठिकाणी आले म्हणून विशाल ताराम त्यांच्यासोबत चेष्टा मस्करी करून ते एकमेकाला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी बाजूच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात उभा असलेला आरोपी सूरज चुनीलाल मेश्राम (२८), रा. शहरवाणी याला ते लोक शिवीगाळ करीत आहे असे वाटले. त्यावर सूरज मेश्राम व विशाल ताराम यांच्यात वाद झाला.
त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सूरज मेश्राम तेथून निघून गेला. काही वेळातच त्याचे वडील चुनीलाल तुकाराम मेश्राम (५०) व भाऊ अमर चुनीलाल मेश्राम (२०) यांच्यासोबत परत आला. त्यावेळी चुनीलाल मेश्राम यांनी सोयब पुराम यांना काठीने मारण्याचा प्रयत्न केला. अमर मेश्राम यानेही सोयब यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरून सोयब त्या ठिकाणाहून पळून गेला. यावेळी रागात असलेल्या तिन्ही आरोपींनी विशाल ताराम याला मारहाण केली. अमर मेश्राम याने त्याच्याजवळील चाकूने विशाल मेश्राम याच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न केला. तक्रारीवरून ७ जुलै रोजी गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम कलम ३०७, ३२३, ३५२, ५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काही तासांतच आरोपी अटकेत
या प्रकरणातील तिन्ही बापलेकांना अवघ्या काही वेळातच अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार मनोहर अंबुले, भूपेश कटरे, भरत पारधी, पोलिस नायक महेंद्र कटरे, पोलिस शिपाई राजेश राऊत यांनी केली आहे.
११ पर्यंत पोलिस कोठडी
प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींना ७ जुलै रोजी गोंदियाच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी सूरज चुनीलाल मेश्राम (२८), अमर चुनीलाल मेश्राम (२०), चुनीलाल तुकाराम मेश्राम (५०) रा. शहारवाणी या तिन्ही बापलेकांना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.