ॲपमध्ये माहिती भरण्याचे काम हे तांत्रिक कर्मचाऱ्यांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:49+5:302021-09-05T04:32:49+5:30
गोरेगाव : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी जमिनीच्या सात-बारावर आता स्वतःच ई-पीक पाहणी ॲपच्या सहाय्याने माहिती भरणे शासनाने बंधनकारक केले ...
गोरेगाव : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी जमिनीच्या सात-बारावर आता स्वतःच ई-पीक पाहणी ॲपच्या सहाय्याने माहिती भरणे शासनाने बंधनकारक केले आहे. हे मात्र शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार असल्याने शासनाने हे काम कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना शासनाकडील मदत, पीक कर्ज, पीक विमा आदींचा लाभ घ्यायचा असेल तर स्वतः शेतकऱ्याला ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीक पेरा भरावयाचा आहे. ग्रामीण भागात आजही अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल नाही. मोबाइल असले तरी व्यवस्थित नेटवर्क नसून विशेष म्हणजे ८० टक्के शेतकऱ्यांना हे ॲप कसे डाऊनलोड करायचे, कशी माहिती भरायची, याचे ज्ञान नाही. या ॲपमध्ये माहिती भरताना शेतकऱ्यांना खाते क्रमांक, भूमापन गट, लागवडक्षेत्र, हंगाम, पिकाचा वर्ग, पिकाचा प्रकार, पिकांचे-झाडांचे नाव, भातपिकाचे क्षेत्र, सिंचन व्यवस्था यांसह विविध प्रकारची माहिती भरून शेतातील पिकांचे फोटो अपलोड करावयाचे आहे. शेतकऱ्यांना आधीच एक ना अनेक समस्या आहेत. त्यातही आता शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. या ई-पीक पाहणी ॲपमध्ये किती शेतकरी माहिती भरणार, हे वेळच सांगणार असली तरी माहिती न भरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ याची दखल घेऊन ई-पीक पाहणी ॲपमधील माहिती शासकीय कर्मचाऱ्यांकडून भरून घ्यावी, अशी मागणी टेंभरे यांनी केली आहे.