जिल्ह्यातील ९५ हजार बांधकाम कामगारांना मदत : साडेतीन हजार अर्ज प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:49+5:302021-03-09T04:32:49+5:30
गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बांधकाम कामगारांना बसला होता. जवळपास वर्षभर बांधकामे ठप्प असल्याने ...
गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बांधकाम कामगारांना बसला होता. जवळपास वर्षभर बांधकामे ठप्प असल्याने कामगारांचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने बांधकाम कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी दोन टप्प्यात आर्थिक मदत दिली. याचा लाभ जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ६५ कामगारांना देण्यात आला. तर ३६५८ अर्ज कामगार कार्यालयाकडे अद्याप प्रलंबित आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण ९५ हजार ६५ बांधकाम कामगार असून या कामगारांची नोंदणी कामगार विभागाकडे करण्यात आली आहे. या कामगारांची शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. गोंदिया जिल्ह्यात सुध्दा बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यात जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील कामगारांचा सुध्दा समावेश आहेे. तर ३६५८ कामगारांचे अर्ज कामगार कार्यालयाकडे प्रलंबित आहे. या अर्जांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुध्दा शासनाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
...........
अर्जांमध्ये काय त्रुटी
- बांधकाम कामगारांच्या अर्जांमध्ये मुख्य दस्तावेज समजल्या जाणाऱ्या कामाच्या ९० दिवसाच्या प्रमाणपत्रातच प्रामुख्याने त्रुटी असतात त्यामुळे सर्वाधिक अर्ज रद्द होतात.
-प्रमाणपत्र घेताना त्यावर खाडाखोड केली जाते. पुरावे जोडताना कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही.
- बऱ्याच अर्जासोबत आधार कार्ड आणि स्वयंघोषणापत्र जोडले नसते. आधार कार्डवर जन्मतारखेची नोंद असणे आवश्यक आहे.
- ग्रामसेवकाचे अटीचे प्रमाणपत्र त्याच्या सही आणि शिक्क्यासह नसल्याने अर्ज रद्द होतात.
.........
कारण काय
कोट
बांधकाम कामगार कामगार विभागाकडे अर्ज करताना लाभ मिळावा यासाठी बरेचदा खोटे प्रमाणपत्र जोडतात. यासाठी प्रमाणपत्रावर खाडाखोड सुध्दा करतात. त्यामुळे असे अर्ज रद्द केले जातात. या अर्जांमध्ये ९० दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र जोडताना घोळ केला जातो त्यामुळेच अर्ज रद्द होतात.
- अविनाश ढोके, नोंदणी अधिकारी, कामगार कार्यालय.
..........
जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या
९५०६५
लाभ मिळालेल्या जिल्ह्यातील एकूण कामगारांची संख्या
९५०६५
त्रुटी असल्याने लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार
३६५८
.............
मी बांधकाम कामगार असून याची अधिकृत नोंदणी कामगार कार्यालयाकडे केली. मला शासनाच्या योजनेतंर्गत मला दोन टप्प्यातील मदत मिळाली आहे.
- रामप्रसाद सोनुले, कामगार,
...........
मी कामगार कार्यालयाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे. पण अद्यापही मला मदत मिळालेली नाही. याबाबत कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी अर्जात त्रुटी असल्याचे सांगितले. त्यामुळे मला मदतीची प्रतीक्षा आहे.
- गुरुदास वसाके, बांधकाम कामगार
.............