आशांना मिळणार मोफत एमएससीआयटीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:21 PM2017-12-13T22:21:52+5:302017-12-13T22:22:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरोग्य विभागासह गावातील ३५ प्रकारचे कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविका आत्मनिर्भर व्हावी. पुढच्या काळात त्यांना शासकीय नोकरी मिळविता यावी, यासाठी त्यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण नि:शुल्क देण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीने पुढाकार घेतला घेतला आहे. जिल्ह्यातील ११५९ आशा सेविकांना हे प्रशिक्षण टप्याटप्याने दिले जाणार आहे.
शासनाने मंजूर केलेले नियमित लसीकरण, पल्स पोलिओ, सिकलसेल, पॅलटिव्ह केअर, जननी सुरक्षा योजनेचा लाभ, प्रसूतीकरीता महिलांना आरोग्य संस्थेत नेणे, शस्त्रक्रिया करण्यास प्रवृत्त करणे, पुरुषांना कुटूंबनियोजनाकरिता प्रवृत्त करणे, कॅट वन, एमडीआर/एक्सडीआर, हिवतापाच्या गोळ्या वाटणे, कुष्ठरोगाची माहिती देणे, ग्राम संपर्क साधणे, इंद्रधनुष्य उपक्रम राबविणे, साथरोग उद्रेक नियंत्रणासाठी मदत करणे, एचआयव्ही ग्रस्त महिलांना मदत करणे, कुपोषित बालकांच्या उपचारासाठी मदत करणे आदी विविध कामे आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून केले जातात. तुटपुंज्या मानधनावर त्या काम करीत असल्याने त्यांना पुढचे शिक्षण घेता येत नाही. पैशा अभावी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. शासनाच्या कोणत्याही नोकरीत लागण्यासाठी एमएससीआयटीची गरज असल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक आशा स्वयंसेविकेला प्रशिक्षण देण्याची तयारी आरोग्य समितीने दर्शविली आहे.
या प्रशिक्षणासाठी प्रत्येक स्वयंसेविकेवर ४ हजार रुपये खर्च जिल्हा निधीतून खर्च करण्यात येणार आहे. या आशा स्वयंसेविका भविष्यात आरोग्याच्या कामात उपयुक्त ठरेल. या हेतूने प्रत्येक तालुक्यातून आशा स्वयंसेविकाना टप्याटप्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या संदर्भात ५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने ठराव घेतला आहे. आशा स्वयंसेविकाना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा निधीतून मिळणाºया रकमेच्या आधारावर प्रत्येक तालुक्यांना समप्रमाणात निधी वाटून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आरोग्य विभागाला भविष्यात सेवा देण्याच्या उद्देशाने उपयुक्त ठरतील हा हेतू समोर ठेवून सर्व आशा स्वयंसेविकांना टप्याटप्याने जिल्हा परिषदेच्या मार्फत एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेतला आहे.
पी.जी.कटरे, आरोग्य सभापती जि.प.गोंदिया