केशोरीच्या मिरचीवर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:18 PM2018-02-11T21:18:01+5:302018-02-11T21:21:08+5:30

अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली केशोरी येथील मिरची विविध रोगांनी ग्रासल्यामुळे यंदा या मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Attack on Kishori pepper | केशोरीच्या मिरचीवर रोगांचे आक्रमण

केशोरीच्या मिरचीवर रोगांचे आक्रमण

Next
ठळक मुद्देयंदा उत्पादन घटणार : मसाले पीक असल्याने अनुदानापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली केशोरी येथील मिरची विविध रोगांनी ग्रासल्यामुळे यंदा या मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर स्वादिष्ट व चवदार असलेली केशोरीची मिरची नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.
सध्या केशोरी परिसरातील मिरची पिकावर बोकडी, चुड्डी, मुरडा, मुळकुज, फळ कुजवी, बुरसी या रोगांनी आक्रमण केले आहे. मिरचीचे उभे झाडे करपत चालले आहेत. त्यामुळे मिरची रोपांना मिरची फळ लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम यंदा मिरची उत्पादनावर होऊन मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बोकडी व चुड्डी या रोगांनी ग्रस्त असलेल्या मिरची पिकावर औषध फवारणी करुन देखील नियंत्रण होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पूर्वी रोगराई नव्हती व नांगराने बैलजोडीने नागरणी केली जात होती. तेव्हा रोग दिसत नव्हते व एकरी ८-१० खंड्या मिरचीचे उत्पादन होत होते. उत्पादनाचे प्रमाण आता एकरी २ खंड्यांवर आले असल्याचे केशोरी येथील शेतकरी हरिराम लंजे यांनीसांगितले. गेल्या ३०-४० वर्षांपासून वडिलोपार्जित मिरचीचे आपण उत्पादन घेत आहोत. ट्रॅक्टरने आता नागरणी करतो. आमचे वडील व आम्हीही एकरी ९-१० खंड्या मिरची पिकवीत होतो. दिवसेंदिवस मिरची उत्पादनात घट होत असून आता दोन ते तीन खंड्या एकरी उत्पादन होते. लागवड खर्चापेक्षा कमी भाव मिरचीला मिळतो. शासनाची कसलीही मदत मिळत नाही. त्यामुळे आता मिरचीचे उत्पादन घेणे परवडत नाही असे शेतकरी शामराव शेंडे यांनी सांगितले.
मिरची हे मसालावर्गीय पिकांच्या वर्गवारीत येत असल्यामुळे व जिल्ह्यात या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे हळदीच्या पिकांप्रमाणे या पिकाला शासनाचे अनुदान मिळत नाही. शवाय या पिकाकडे केवळ मसाला वर्गीय पीक म्हणून या पिकाची होणारी परवड यामुळे केशोरी परिसरातील मिरची पिकांचे लागवड क्षेत्र १०० टक्क्यावरुन ४७ टक्के वर आले आहे. यामुळे येथील शेतकरी मिरची पिकाकडून मका व धान पिकांकडे वळत आहे. लोडशेडिंग, मजुरांचे वाढते दर व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हेही कारण मिरचीला भोवत आहे.
अशात शासकीय उपाययोजना केली गेली नाही. तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर लज्जतदार, स्वादिष्ट व चवदार अशी केशोरीची मिरची दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात केशोरी मिरचीच्या शौकीनांना या मिरचीची चव चाखायला मिळणार नाही. करिता मिरचीला हळदी पिकाप्रमाणे अनुदान, ५० टक्के अनुदानावर औषधींचा पुरवठा, पीक विमा योजना आदी सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

केशोरी गावात १२ हेक्टरला मिरची पिकाची लागवड आहे. कृषी पर्यवेक्षक वेळोवेळी शेतकºयांना मार्गदर्शन करतात. संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांना बोलावून शेतकऱ्यांची कार्यशाळा येथे घेण्यात आली. सातत्याने एकचएक पीक घेतल्यामुळे जमिनीची पोत घसरते. त्यामुळे पिकांची अदलाबदल करणे गरजेचे असते. मसाला पिकात मिरचीचा समावेश होत असल्यामुळे व लागवड क्षेत्र मेजर नसल्याने शासकीय अनुदान दिले जात नाही. मार्गदर्शनाची नीट अमंलबजावणी शेतकरी करीत नाही.
-संजय रामटेके
मंडळ कृषी अधिकारी, नवेगावबांध

..................
बिज प्रक्रिया, किटकनाशक फवारणी, एकाच जागेत वारंवार एकच घेतले जाणारे पीक, वर्षभर शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जमिनीत बुरशी शिल्लक राहत असल्याने चुरडा, मुरडा, बोडखी, मुळकुज हे रोग या पिकावर आक्रमण करतात. पिकात फेरबदल आवश्यक आहे.
-बी.टी. राऊत
कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग

..............
मिरची पिकाचा समावेश मसाला वर्गीय पिकात केल्या गेल्यामुळे हळदी पिकासारखे अनुदान या पिकाला मिळत नाही. या पिकाला अनुदान मिळावा, पीक विमा योजना लागू करावी, मसाला पिकातून वगळण्यात यावे, अनुदानावर औषधांचा जादा पुरवठा करावा अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत. हळदी पिकाप्रमाणे मिरची पिकालाही अनुदान मिळावा यासाठी जिल्हा परिषद सभेत मी प्रयत्न करेन.
-तेजुकला गहाणे
जि.प. सदस्य, केशोरी

Web Title: Attack on Kishori pepper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.