आमदारांवरील हल्ला हा कट?
By admin | Published: April 15, 2016 02:18 AM2016-04-15T02:18:49+5:302016-04-15T02:18:49+5:30
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिव शर्मा यांच्या दोन साथीदारांना बुधवारी (दि.१३) रात्री ९.५६ वाजता अटक केली आहे.
दोघांना अटक : बुधवारी रात्री घेतले ताब्यात
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिव शर्मा यांच्या दोन साथीदारांना बुधवारी (दि.१३) रात्री ९.५६ वाजता अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांचे नाव अनिमेश उर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (२२,रा.गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (२१,रा.मरारटोली) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी (दि.९) शिव शर्मा व राहूल श्रीवास तिरोडा रोड वरील अशोका गार्डन रेस्टॉरेंट मध्ये दारू पीत होते. दरम्यान राहूलने अनिमेशला फोन करून बोलाविले. यावर अनिमेश हा त्याचा मित्र गजेंदला घेऊन तेथे पोहोचला. सुमारे ६.३० वाजतादरम्यान चौघे तट रचून बारमधून बाहेर आले. बाहेर आल्यावर आमदार अग्रवाल यांना टपका देंगे अशी बोलचाल करीत असताना त्यांना बाहेर टपरीवर उभ्या एका इसमाने ऐकले होते.
तेथून चौघे हॉटेलात गेले व यातील गजेंद्र हा बाहेर गेटवरच थांबला. तर शिव शर्मा व राहूल श्रीवास तसेच अनिमेश हा आपापल्या बुलेटने हॉटेलाच्या आत गेले. शिव शर्मा व राहूल श्रीवास दोघे आत गेले व अनिमेश मागून हॉटेलात शिरला. तसेच आत मारहाण केल्यानंतर अनिमेशने शिव शर्मा व राहूल श्रीवास यांना बालाघाट पर्यंत सोडले. एकंदर आमदार अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा कट रचण्यात या दोघांचाही हात असल्याने पोलिसांनी दोघांना बुधवारी रात्री अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)