दारुबंदी करणाऱ्या महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:51 AM2017-05-20T01:51:48+5:302017-05-20T01:51:48+5:30
शासकीय मान्यता प्राप्त दारू दुकाने बंद पडल्याने अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
दोन आरोपींना अटक : महिलांनी पोलीस ठाण्यात घालविले पाच तास
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शासकीय मान्यता प्राप्त दारू दुकाने बंद पडल्याने अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. परंतु पोलिसांच्या छुप्या संरक्षणात चालणाऱ्या दारु व्यवसायामुळे महिलांची काळ रात्र ठरत आहे. मध्यरात्रीपर्यंत दारुड्यांमुळे गावातील वातावरण ढवळून निघत आहे. अवैध दारु व्यवसायामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दारु व्यवसायावर अवकळा आली. सरकार मान्य दारु दुकाने बंद पडली आहे. याचा लाभ अवैध दारू विकणारे उचलत आहेत. आमगाव तालुक्यात पुर्वीच दारु व्यवसायामुळे त्रस्त झालेले नागरिक संपूर्ण दारुबंदीकरिता लढा उभारत आहेत. परंतु अधिकृत दुकाने बंद झाल्याने अवैध दारु व्यवसायीकांनी मुसंडी मारली आहे. किंमतीपेक्षा अधिक दराने दारु विक्री करुन नफा कमावण्याकरिता आमगाव तालुक्यात प्रत्येक गावात गल्लोगल्लीत अवैध दारु विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. अवैध दारु विक्री करणारी व्यक्ती मुख्य मार्गावर आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या महिलांची सुरक्षीतता धोक्यात आली आहे. अवैध व्यवसायामुळे गावातील युवकांनाही आकर्षण ठरले आहे.
रिसामा व कुंभारटोली गाव सिमेवर अवैधपणे दारु व्यवसाय करणाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या व्यावसायीकांना पोलीस विभागाने कारवाई करावी, यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. परंतु पोलीस विभाग उलट अवैध दारु विक्रेत्यांना संरक्षण देत आहे. यासंदर्भात महिलांनी दारु विक्रेते व पोलीस प्रशासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त करीत १७ मेच्या रात्री १० वाजता पोलीस ठाण्यावर महिलांना मोर्चा काढून सलग पाच तास पोलिसांच्या विरूध्द आक्रोश करण्यात आला.गावात दारुबंदीची मागणी करणाऱ्या महिलांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर हल्ला चढविण्यात आला.
कुंभारटोली गाव परिसरात अवैध दारु बंदी व्हावी यासाठी महिलांनी अवैध दारु विकणाऱ्या व्यक्तीला १८ मे रोजी १० वाजता चांगलाच चोप दिला. या अवैध दारु विक्रेत्याला अटक करावी यासाठी गावातील महिलांनी रात्रीच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. परंतु ठाणेदाराने दखल घेतली नाही.
आरोपीवर
अॅट्रॉसिटीसह गुन्हा
रिसामा वार्ड क्र.६ मध्ये अवैधपणे दारुविक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लक्ष्मी ईश्वर डोंगरे यांनी आवाज उठविला. त्यामुिळे त्यांच्यावर आरोपी अविनाश मुन्ना चौधरी (२२) रा. रिसामा याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान त्याच्यावर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २१९, ५०६, सहकलम ३ (१)(आर)(एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध विक्रेत्याकडून
३२ पव्वे जप्त
कुंभारटोली परिसरात अवैधपणे दारु विक्री करणारा निमचंद बारकू गोंडाणे (६०) यांच्याकडून ३२ दारूचे पव्वे किंमत १६०० जप्त करण्यात आले.