रोजगार उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:04 PM2019-02-18T22:04:49+5:302019-02-18T22:05:09+5:30
सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान (नागपूर) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने आयोजित रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बाटीर्चे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, सडक-अर्जुनी पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, कविता रंगारी, पदमा परतेकी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, देवेंद्र टेंभरे, विजय बिसेन, मधुकर मरस्कोल्हे, लक्ष्मीकांत धानगाये, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, प्राचार्य बलवीर, गजानन डोंगरवार, रतन वासनिक मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजे. या मेळाव्यात जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे बार्टीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले. कणसे यांनी, या मेळाव्याच्या माध्यमातून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त मनाची प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे असे सांगितले.
याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्राम उसगाव येथील रुपाली मेश्राम हिने वाघाशी मुकाबला करुन प्राण वाचविण्याचे शौर्य दाखविल्याबद्दल त्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीमध्ये समता दूत पदावर नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त गायकवाड यांनी मांडले. संचालन रत्नाकर बोरकर यांनी केले. आभार बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे यांनी मानले.
विविध विभागांचे स्टॉल्स
या मेळाव्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, बँकींग, फायनान्स, मॅन्यूफॅक्चरींग, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, हॉस्पीटॅलिटी, एव्हीएशन व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्यचा स्टॉल लावण्यात आला होता. लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.