पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू
By admin | Published: August 26, 2016 01:32 AM2016-08-26T01:32:37+5:302016-08-26T01:32:37+5:30
खड्डयातील पाणी धानपिकाला देण्याच्या प्रयत्नात एका तरूण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दिघोरी-साखरा येथील प्रकार : सहा महिन्यांपासून खाण काम बंद
दिघोरी (मोठी) : खड्डयातील पाणी धानपिकाला देण्याच्या प्रयत्नात एका तरूण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास साखरा शिवारातील पावरी कायनाईट खाण परिसरात घडली. किशोर खुशाल गोटेफोडे (३६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यात साखरा येथे पावरी कायनाईट खाण आहे. या खाणीलगत तुळशीदास चिमनकार यांचे शेत आहे. धानपिकाला पाणी देण्यासाठी किशोर व तुळशीदास मोटारपंप लावण्यासाठी गेले होते. तुळशीदास पाईप लावण्यात मग्न होता. किशोरच्या हातातून पाईप पाण्यात पडल्याने ते काढण्यासाठी किशोर पाण्यात उतरला. दरम्यान तो खोल खडड्यात पडला. परंतु तो तुळशीदासला दिसला नाही. बराच वेळ होऊनही किशोर दिसत नसल्यामुळे तुळशीदासने शोधाशोध केली त्यानंतर गावाकडे जावून सदर प्रकार सांगितला. गावकरी जमा झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू असतानाच किशोरचा मृतदेह खोल खडड्यात गवसला.
किशोर गोटेफोडे हा अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे केवळ ०.२५ आर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व मजुरीवर होता. त्यांच्यामागे वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यामुळे गोटेफोटे कुटूंबीयांवर संकट कोसळले आहे. पावरी कायनाईट खाणीच्या निष्काळजीपणामुळे किशोरचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून या खाण मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
खाण परिसरात सुरक्षेचे तीनतेरा
सन २००० मध्ये ११ हेक्टर क्षेत्रात विस्तारीत पावरी कायनाईट खाण ३० वर्षासाठी लिजवर देण्यात आली आहे. खाणीची मुदत आणखी १४ वर्षे आहे. याठिकाणी सभोवताल उत्खणन झाल्याने ढिगारे तयार आहेत. मागील सहा महिन्यापासून या खाणीचे काम बंद आहे. सभोवताल खोदलेल्या खडडयांना कुठेही सुरक्षा कठडे लावण्यात आले नसून सुरक्षारक्षकही नाही. याठिकाणी सुरक्षा फलकाचाही पत्ता नाही. खाण बनविताना बेंच पद्धतीने खोलीकरण करण्याची नियमावली असताना या नियमाचे उल्लंघन करण्यात आले. बेंच पद्धतीने खड्डे बनविले असते तर अपघात घडला नसता. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्यामुळे खाण मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी किशोरची पत्नी सिंधू गोटेफोडे व तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने केली आहे.