भयंकर! गोंदियात ‘बचपन का प्यार’ला घेऊन तिघांच्या खुनाचा प्रयत्न; तिलाही धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 05:28 PM2022-04-26T17:28:17+5:302022-04-26T17:48:41+5:30
गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. ती मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन मुलीच्या घरी गेला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
गोंदिया : गोंदियात एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली आहे. १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात वेडा झाला. परंतु, ती बोलत नसल्याने त्याचा राग अनावर झाला व त्याने थेट तिचे घर गाठत तिला तिच्या कुटुंबियांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तिच्या आईने नातेवाइकांना मदत मागितली असता, त्याने दोन नातेवाइकांवर चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. तर मुलीच्या नातेवाइकांनी दुसऱ्या गटातील एकावर चाकूने हल्ला केला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यातील दोन गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. ही थरारक घटना २४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडली.
गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो मुलगा आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन त्याने २४ एप्रिल रोजी रात्री मुलीचे घर गाठले. तू माझ्याशी बोलली नाही तर तुला चाकूने मारून ठार करील, अशी धमकी दिली. यावर धास्तावलेल्या मुलीच्या आईने ओळखीचे व नातेवाईक असलेल्या लोकांना सांगितले.
यात नातेवाईक आल्यावर दोन्ही गटांत वाद झाला. यात माताटोली राजेंद्र वाॅर्ड श्रीनगर येथील अभिषेक उर्फ जादू प्रेमलाल वर्मा (१८) याने परमानंद देवानंद नागभिडे (२६, रा. गौतमनगर, गोंदिया) व धर्मराज बावनकर (२८) या दोघांना चाकूने मारून खुनाचा प्रयत्न केला. तर परमानंदच्या गटातील लोकांनी अभिषेक उर्फ जादू प्रेमलाल वर्मा (१८) याला चाकूने मारून त्याच्याही खुनाचा प्रयत्न केला. या वादात तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यातील जखमी परमानंद नागभिडे व धर्मराज बावणकर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. अभिषेक वर्मा याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. दोन्ही गटांतील व्यक्तींवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात पैकी तीन विधी संघर्षित बालके
तिहेरी खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणात दोन्ही गटांतील सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सात पैकी तीन विधिसंघर्षित बालके आहेत. त्यातील एक श्रीनगर, दुसरा पैकनटोली तर तिसरा भीमनगरातील आहे.