बोगस सातबारे तयार करून ५ एकर शेती विक्रीचा प्रयत्न

By नरेश रहिले | Published: August 10, 2024 07:59 PM2024-08-10T19:59:34+5:302024-08-10T19:59:52+5:30

- आमगाव पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल : ७५ लाख रुपये एकरने केला होता सौदा

Attempt to sell 5 acre farm by creating bogus Satbare | बोगस सातबारे तयार करून ५ एकर शेती विक्रीचा प्रयत्न

बोगस सातबारे तयार करून ५ एकर शेती विक्रीचा प्रयत्न

नरेश रहिले, गोंदिया : आमगाव शहरातील सालेकसा मार्गावरील रहिवासी प्रल्हाद मनिराम कारंजेकर (६२) या शेतकऱ्याच्या बनगाव येथील पाच एकर शेतीचे बोगस सातबारे, आधार कार्ड व वीज बिल तयार करून ती शेती गोंदियातील एकाला विक्री करण्याचा सौदा करण्यात आला. या प्रकरणात पाच आरोपींवर आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रल्हाद कारंजेकर यांची शेती कामठा रोड बनगाव येथे गट क्रमांक-३५२ मध्ये २ हेक्टर ५ आर. तसेच गट क्रमांक-३९९ मध्ये २६ आर. शेती आहे. ती शेती आरोपी जितेंद्र इसुलाल थेर (रा. बाम्हणी), बालू उर्फ ज्ञानेश्वर बळीराम कापगते (रा. साखरीटोला, हल्ली मुक्काम पोलिस ठाण्याच्या मागे, आमगाव), बाबा लिल्हारे (रा. कमलानगर, आमगाव), जितेंद्र पाचे (रा. कोस्ते, ता. किरणापूर-बालाघाट) व इतर दोन अशा पाच जणांनी ५ एकर १२.५ डिसमील जमीन ७५ लाख रूपये एकर या भावाने गोंदियातील एकाला विक्री करण्याचा प्रयत्न केला. २२ नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या दरम्यान जमीन विक्रीचा प्रयत्न करण्यात आला. त्या पाचही जणांवर आमगाव पोलिसांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय वळसे करीत आहेत.
......
असा आला प्रकार लक्षात
- शेतमालक कारंजेकर हे २२ नोव्हेंबर २०२३ रोजी शेताकडे गेले होते तेव्हा त्यांच्या शेताजवळ राहणारे पांडुरंग भांडारकर यांच्या आईने तुम्ही आपली शेती विकली आहे काय असे विचारले. यावर कारंजेकर यांनी शेती विकली नाही असे म्हटले. परंतु तुमची शेती पाहण्याकरिता लोक गाड्या घेऊन येत आहेत असे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्या घराकडील लोक तुम्ही शेती विकली आहे काय असे विचारत होते. यातून हा शेती चोरीचा प्रकार पुढे आला.
......
बँकेचे खाते उघडल्याची झाली माहिती
- २३ नोव्हेंबर २०२३ रोजी कारंजेकर यांचे बहीण जावई ईश्वर बिसेन (रा. किकरीपार) यांनी फोन करून को-ऑपरेटिव्ह बँकेचा चपराशी कमलेश जांभुळकर (रा. किकरीपार) यांनी फोटो दाखवून ईश्वर बिसेन यांना प्रल्हाद कारंजेकर हेच आहेत का असे विचारले. त्यावर त्यांनी फोटोत दिसणारे प्रल्हाद कारंजेकर नाहीत असे जांभूळकर यांना सांगितले व याबाबत कारंजेकर यांना दिली.
......
पाच लाखांचा झाला व्यवहार
-को-ऑपरेटिव्ह बँकेत पडताळणी करीता १ डिसेंबर २०२३ रोजी येथील मुख्य कार्यालयातील अधिकारी आमगाव येथील को-ऑपरेटिव्ह बँकेत गेले होते. अधिकाऱ्यांसमोर को-ऑपरेटिव्ह बॅंक आमगावचे व्यवस्थापक सुनील कन्नमवार यांनी खाते उघडण्याचे कागदपत्र, आधार कॉर्ड, सातबारा, इलेक्ट्रिक बिल व पाच लाख रुपयांची देवाण-घेवाण केल्याचे कागदपत्र दिले. बँकेत ज्या खातेधारकाची फोटो देण्यात आली होती त्या खातेधारकांनी दिलेली फोटो स्पष्ट दिसत नव्हती.

Web Title: Attempt to sell 5 acre farm by creating bogus Satbare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.