आमगाव खुर्दच्या प्रकरणात प्रयत्न करणार
By admin | Published: July 11, 2017 12:51 AM2017-07-11T00:51:01+5:302017-07-11T00:51:01+5:30
आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सालेकसा नगर पंचायतीत समाविष्ट करुन लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी ...
आमदार पुराम यांचे आश्वासन : गावकऱ्यांनी दिले मागण्यांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सालेकसा नगर पंचायतीत समाविष्ट करुन लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी आणि लोकशाही शासन स्थापीत करण्यात यावे अशी मागणी आमगाव खुर्द (सालेकसा) येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्या मागणीचे निवेदन आमदार संजय पुराम यांना दिले आहे.
तालुका भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, मागील अडीच वर्षापूर्वी सालेकसा नगर पंचायतीची घोषणा करण्यात आली. परंतु अस्सल स्वरुपात सालेकसा नगर पंचायतीमध्ये समाविष्ट होणे अनिवार्य असलेले सालेकसा नगर जे सध्या परिस्थितीत आमगाव खुर्द ग्राम पंचायतीत मोडते त्याला नगर पंचायतमध्ये शामील न केल्यास शहरवासीयांवर अन्याय झाल्यासारखे वाटते.
यासाठी शहरवासीयांनी उच्च न्यायालयात सुध्दा धाव घेतली आहे. परंतु प्रकरण लंबीत आहे. न्यायालयाचा निकाल नेमका केव्हा लागेल हे सांगणे कठीण आहे.
परंतु या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली तर आमगाव खुर्द आणि सालेकसा मिळून एक नगर पंचायत व्यवस्थीतरित्या अस्तित्वात येऊ शकते तसेच न्यायालयातील प्रकरण सुध्दा निरस्त होऊ शकते.
ही बाब लक्षात घेता तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार पुराम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
तसेच आमदार या नात्याने आपल्या मतदारांच्या समस्या दूर कराव्या म्हणून आ. पुराम यांनाही आग्रह करण्यात आला. यावर आ. पुराम यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमगाव खुर्द येथील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
निवेदन देणाऱ्यामध्ये तालुका भाजप अध्यक्ष परसराम फुंडे यांच्या नेतृत्वात अजय वशिष्ट, दिनेश शर्मा, अजय डोये, संदीप डेकाटे, मनोज इळपाते, धीरज ब्राम्हणकर, बबलू भाटीया, आदीत्य शर्मा आदीच्या या शिष्टमंडळात समावेश होता.