बबलू कटरे यांना वाचविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 01:20 AM2017-04-02T01:20:51+5:302017-04-02T01:20:51+5:30
गेल्या १२ मार्च रोजी आमगाव-गोंदिया मार्गावर इंडिगो कार व एक्टीवा या दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात कार चालक बबलू कटरे होते.
ठाणेदार व शिपायांवर कारवाई करा : अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींची मागणी
गोंदिया : गेल्या १२ मार्च रोजी आमगाव-गोंदिया मार्गावर इंडिगो कार व एक्टीवा या दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात कार चालक बबलू कटरे होते. मात्र आमगावचे ठाणेदार व सहयोगी शिपायांनी चौधरी नामक इसमास पुढे केले. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांत तक्रार केली असता त्यांना अपमानीत करून पळविण्यात आले. त्यामुळे बबलू कटरे यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस करीत असून प्रकरणी ठाणेदार भस्मे व सहयोगी शिपायांवर कारवाई करण्याची मागणी अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.
१२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता आमगाव-गोंदिया मार्गावर घडलेल्या या अपघातात इंडिगो कार क्रमांक एमएच ४०/केआर १९०१ चालक बबलू कटरे यांनी एक्टीवा क्रमांक एमएच ३५/वाय ०७६८ ला जबर धडक मारून पसार झाले. या अपघातात एक्टीवा वरील दोघांचा मृत्यू झाला. असे असतानाही ठाणेदार भस्मे यांनी कटरेंना वाचविण्यासाठी खोटी एफआयआर नोंद करून चौधरी नामक इसमास पुढे केले. जेव्हाकी प्रत्यक्षदर्शी डी.डी.टेंभूर्णेकर व यु.ए.चतुर्वेदी यांनी आमगाव पोलीस ठाण्यात जाऊन कटरेंचा नामोल्लेख केला असता त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हाकलून लावण्यात आले.
करिता कटरे यांना दोघांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार मानले जावे व अटक करावी, ठाणेदार भस्मे यांनी पदाचा दुरूपयोग केल्याने त्यांच्यासह शिपायांवर कारवाई करा तसेच चौधरीवरही कारवाई करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे. यासाठी त्यांनी मानवाधिकार एसोसिएटकडे निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)