पदवीधर युवकांसाठी रोजगार खेचून आणावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:42+5:302021-01-22T04:26:42+5:30
आमगाव : नागपूर पदवीधर मतदारसंघातील मुख्याध्यापक व शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक, बेरोजगार संघटनांचे युवक, विनाअनुदानित ...
आमगाव : नागपूर पदवीधर मतदारसंघातील मुख्याध्यापक व शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक, बेरोजगार संघटनांचे युवक, विनाअनुदानित शिक्षक संघटनांचे शिक्षक, बेरोजगार पदवीधर अशा अनेक पदवीधरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना प्रचंड बहुमताने विधान परिषदेवर पाठवले. वंजारी यांनी पदवीधर युवकांसाठी शासनस्तरावरून विविध रोजगार खेचून आणाव्या, असे प्रतिपादन म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या परिसरात शनिवारी वंजारी मित्र परिवारच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सत्कारमूर्ती आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष एन. डी. किरसान, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, नागपूर विभाग शिवसेना संघटक किरण पांडव, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अमर वराडे, जि. प. माजी अध्यक्ष उषा मेंढे, काँग्रेसचे गप्पू गुप्ता, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष कविता रहांगडाले, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. मेश्राम, शिक्षक भारतीचे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे, कार्यक्रमाचे संयोजक व स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलचे संस्थापक राजेश गोयल उपस्थित होते. यावेळी आमदार वंजारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार वंजारी यांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या समस्या, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार, पेन्शनधारकांच्या विविध समस्यांचा पाठपुरावा करून शासनाच्या योजना खेचून आणण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक गोयल यांनी मांडले. संचालन संतोष श्रीखंडे यांनी केले. आभार महेश उके यांनी मानले.