रेतीघाटांचे त्वरित लिलाव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:25 AM2021-02-08T04:25:29+5:302021-02-08T04:25:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बिरसी-फाटा : वैनगंगा आणि विविध नद्यांतून वाळू तस्कर रेतीचा प्रचंड उपसा करत असल्याने पर्यावरणाला मोठा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बिरसी-फाटा : वैनगंगा आणि विविध नद्यांतून वाळू तस्कर रेतीचा प्रचंड उपसा करत असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव करुन वाळूची होणारी तस्करी थांबविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष ढमेंद्रसिंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री कार्यालय व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. मात्र, असे असतानाही प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे महसूल अधिकारी व पोलिसांच्या डोळ्यांसमोरूनच रेतीचा उपसा व वाहतूक केली जात आहे. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते व यासाठी जणू स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.
दिवसाढवळ्या ट्रकमधून रेतीची खुलेआम तस्करी होत असताना कुणीही त्यावर कारवाईसाठी पुढे येत नाही. उलट वेळेवर रसद पोहोचली नाही तर मात्र कारवाईचा सोपस्कार केला जातो. या व्यवसायात अनेकांची भागीदारी आहे. त्यात शासकीय अधिकारी-कर्मचारीही सहभागी असल्याची माहिती आहे. या माध्यमातून शासनाचा महसूल पूर्णतः बुडवला जात आहे. त्यामुळे रेतीघाटांचा तातडीने लिलाव करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.