ऑटो टिप्परला लागलेले ग्रहण सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:06+5:30
याबाबत ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजी ‘कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित करून हा प्रकार पुढे आणला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषदेने त्याचदिवशी निविदा उघडली. मात्र काही तांत्रीक अडचण आल्याने १९ तारखेला दरपत्रक उघडण्यात आले.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निविदा उघडण्यात झालेले दुर्लक्ष व त्यानंतर आता निविदा उघडण्यात आली असताना कार्यादेश देता येणार नसल्याने नगर परिषदेला मिळालेल्या ३३ ऑटो टिप्पर मागे लागलेले ग्रहण काही सुटणार नाही. परिणामी आणखी किमान दोन महिने तरी ऑटो टिप्पर नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात धूळ व पाणी खात पडून राहणार यात शंका नाही.
शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संकलित करता यावा, यासाठी नगर परिषदेला शासनाकडून ३३ ऑटो टिप्पर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, नगर परिषदेने कोट्यवधी रूपये खर्चून हे ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले. ते जुलै महिन्यात नगर परिषदेत आले. मात्र ते ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेकडे मनुष्यबळ नसल्याने नगर परिषदेने ऑटो टिप्परसाठी १० जुलै रोजी ३३ चालक व ३३ हमालांसाठी निविदा टाकली. मात्र या निविदेकडे दुर्लक्ष झाल्याने ३३ ऑटो टिप्पर आता नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात धूळ व पाणी खात पडून आहेत.
याबाबत ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजी ‘कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित करून हा प्रकार पुढे आणला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषदेने त्याचदिवशी निविदा उघडली. मात्र काही तांत्रीक अडचण आल्याने १९ तारखेला दरपत्रक उघडण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये खडकी (पूणे) येथील एका एजंसीने निविदा रकमेच्या २ टक्के दर कमी टाकल्याने त्यांना हे काम देता येते. मात्र नियमानुसार, संबंधिताला आठ दिवसांच्या आत निविदा रकमेच्या १ टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावयाची आहे. अशात आता आणखी दोन दिवस उरत आहे. एकंदर निविदेची प्रक्रिया झाली आहे. मात्र दोन महिने अडकवून ठेवलेल्या या निविदेचा आता काहीच फायदा होणार नाही. कारण निविदा प्रक्रिया झाली असली तरीही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संबंधिताला कार्यादेश येत नाही.
यामुळे आता पुढील दोन महिने तरी आचारसंहितेमुळे ऑटो टिप्पर शहरातील रस्त्यांवर धाऊ शकणार नाही. म्हणजेच, कोट्यवधी रूपयांचे हे ऑटो टिप्पर ज्याप्रकारे नगर परिषद कार्यालय परिसरात धूळ व पाणी खात पडून आहेत त्याच स्थितीत राहणार यात शंका नाही. स्वच्छतेच्या विषयाला घेऊन शासन गंभीर असून पैशांची पर्वा न करता नगर परिषदेला सर्व साहित्य पुरवून देत आहे. मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे या चालक व हमाल पुरवठ्याची निविदा अडकून पडली. परिणामी कोट्यवधींचे हे ऑटो टिप्पर सडत पडले आहेत.
जुलैपासून सुरू आहे निविदा प्रक्रिया
प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेने चालक व हमाल पुरवठ्यासाठी १० जुलै रोजी निविदा टाकली. १४ ऑगस्ट रोजी ही निविदा उघडण्यात येणार होती. मात्र त्यात काही अडचण आल्याने दोनवेळा शुद्धीपत्रक टाकून तारीख वाढविण्यात आली व त्यानुसार ३० आॅगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र निविदा उघडण्यात आली नाही. यादरम्यान ‘लोकमत’ मध्ये बातमी प्रसिद्ध होणार असल्याने नगर परिषदेने आपली बाजू सावरत १८ सप्टेंबर रोजी निविदा उघडली.यामुळे संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
ऑटो टिप्परचे साहित्य चालले चोरीला
नगर परिषदेने खरेदी केलेले हे ३३ ऑटो टिप्पर नगर परिषद कार्यालय परिसरात दोन महिन्यांपासून पडून आहेत. यांच्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ऑटो टिप्पर मधील बॅटरी व अन्य साहित्य चोरीला जात असल्याचीही माहिती आहे.नगर परिषदेकडून याबाबत नकार दिला जात असला तरिही कित्येकांकडून याबाबत सांगीतले जात आहे. शिवाय कित्येक वाहनांच्या चाकातील हवा निघाली असून ते उभे असल्याने पुढील दोन महिन्यांत त्यांचीही दुरूस्ती करावी लागणार व तोपर्यंत या वाहनांतील आणखी किती साहित चोरीला जाते हे बघायचे आहे.
निविदेत पाच एजन्सी पात्र
चालक व हमाल पुरवठयासाठी नगर परिषदेने काढलेल्या २.९० कोटींच्या या निविदेत ८ एजन्सीकडून निविदा टाकण्यात आली आहे.यात गोंदियातील तीन तर बाहेरील पाच एजन्सी आहेत. मात्र कागदपत्र छाननीत फक्त पाच एजंसी पात्र ठरल्या व त्यातील खडकी (पुणे) येथील एजंसीचे सर्वात कमी दर आहेत. त्यामुळे नियमांची पूर्तता केल्यास या एजंसीला काम देता येईल. शिवाय अन्य पर्याय उपलब्ध न झाल्यास पुन्हा निविदा टाकावी लागणार आहे.