जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ११.६ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:38+5:302021-06-20T04:20:38+5:30
गोंदिया : हवामान खात्याकडून यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत एक-दोनदाच दमदार ...
गोंदिया : हवामान खात्याकडून यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत एक-दोनदाच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळेच जिल्ह्यात सरासरी १९२.८ मि.मी. पाऊस अपेक्षित असतानाच फक्त १२१.३ मि.मी. पाऊस बरसला आहे. म्हणजेच ९.१३ टक्के पाऊस बरसला असून सर्वाधिक २० मि.मी. पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बरसला आहे.
मान्सून ७ जूनपासून सुरू झाला असूनही अद्याप जिल्ह्यात पावसाने दमदार प्रवेश केलेला नाही. आजही कधी पाऊस तर कधी ऊन तापत असल्याने उकाडा जाणवत आहे. जिल्ह्यात दि. १ ते १९ पर्यंत १९२.८ मि.मी.पाऊस अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत १२१.३ मि.मी.पासून पाऊस बरसला असून, त्याची सरासरी ११.६ एवढी आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत असून खरिपाचे काम घेऊन तो मागे-पुढे बघत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २० मि.मी. सरासरी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बरसला आहे; तर सर्वांत कमी पाऊस ३.२ मि.मी. पाऊस सालेकसा तालुक्यात बरसला आहे. असे असताना आता जिल्ह्यात संततधार पावसाची गरज दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दमदार पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत ५० टक्क्यांच्या आतच पाणीसाठा दिसून येत आहे. शिवाय शेतांमध्येही पावसाचे पाणी साचले नसल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पावसाची वाट पाहावी लागत आहे. दमदार पावसाने सुरुवात केल्यानंतर शेतीची कामे आणखी जोर धरणार आहेत.
---------------------------------
तालुकानिहाय बरसलेला पाऊस
तालुका पाऊस मि.मी. (सरासरी)
गोंदिया १८.९
आमगाव ३.३
तिरोडा १९.२
गोरेगाव ६.३
सालेकसा ३.२
देवरी ६.७
अर्जुनी-मोरगाव २०.०
सडक-अर्जुनी ५.०
एकूण ११.६