तेलाचा वारंवार वापर टाळा; २५ पोलार युनिटच्या आतच खाद्यतेल वापरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:05 PM2024-11-15T16:05:36+5:302024-11-15T16:08:01+5:30
काळेकुट्ट होईपर्यंत तेलाचा उपयोग : आरोग्यासाठी धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हॉटेलात तलाव तेलासाठी खाद्यतेल वारंवार वापरले जाते. परंतु, खाद्यतेल २५ पोलार युनिटवर वापरू नये, अशा सूचना प्रशासनाच्या असतानाही हॉटेलचालकांकडून तेल काळेकुट्ट होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेलचालकांवर अन्न व औषधी प्रशासन विभागातर्फे कारवाई होत आहे.
हॉटेलचालकांनो, स्वतःच्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नका, अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांना वेठीस धरू नका, अन्यथा आपल्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. दिवाळीच्या कालावधीत शहरात अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली. परंतु, या तपासणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे कारवाया करण्यास विलंब होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक ठरतो. समोसा, कचोरी व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यांसाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये. तेल २५ पोलार युनिटपर्यंतच वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरू नये.
व्यावसायिकांनी विशेष सतर्कता बाळगावी
हॉटेल व खाद्य दुकानचालकांनी वारंवार तेच तेल वापरू नये. ज्या हॉटेलात ५० लिटरपेक्षा अधिक तेलाची गरज पडते, अशा हॉटेलांतील खाद्यपदार्थांची तपासणी आधी करण्यात येते. नियम तोडल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
फूटपाथवरील खाद्य न खाल्लेले बरे!
फूटपाथवरील हॉटेलात खाद्यतेल अनेक वेळा वापरले जाते. काळ्ळ्याकुट्ट तेलातून पुन्हा तळलेले पदार्थ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो. फूटपाथ- वरील हॉटेलात खाद्यपदार्थाची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. अनेकदा पदार्थावर माशा बसतात. शिळे पदार्थही तळून विक्रीला ठेवलेले असतात. रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांची धूळ त्या पदार्थावर बसत असते. तळलेले पदार्थ सेवन केल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते.