कचारगड यात्रेतील भाविकांची गैरसोय टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:39 PM2018-01-29T20:39:06+5:302018-01-29T20:39:28+5:30
देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात होत आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून देशातील विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होणार आहे. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण यात्रेदरम्यान येणार नाही. यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांच्या व देवस्थान समितीच्या मदतीने आवश्यक करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कचारगड येथे ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या यात्रेच्या तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, आ. संजय पुराम, आ. डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते. बडोले म्हणाले, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ जल, स्वच्छ परिसर व स्वच्छ अन्न या प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या घोषवाक्यानुसार तिथे व्यवस्था असली पाहिजे. भाविक महिलांसाठी मोबाईल शौचालयाचा वापर करावा. भाविकांसाठी आंघोळीची व्यवस्था असावी. यात्रेदरम्यान बेवारटोला प्रकल्पातून पाणी नाल्यात सोडल्यास भाविकांना आंघोळीसाठी, शौचालयासाठी तसेच पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता होईल. सर्व भाविकांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी यात्रेदरम्यान मिळावे यासाठी प्रशासन व देवस्थान समितीने लक्ष द्यावे. राजे अंब्रीशराव म्हणाले, यात्रा ही सर्वांसाठी आहे. यात्रेदरम्यान कोणीही भडकावू भाषण देणार नाही याची दक्षता घेवून अशांना पोलिसांनी ताब्यात घेवून कारवाई करावी. मागील २५ वर्षापासून कचारगड येथे यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र आपण भाविकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देवू शकलो नाही ही खंत आहे. देवस्थान समितीने यात्रेदरम्यान जबाबदारीने काम करावे. अलीकडच्या तीन वर्षाच्या काळात बरीच विकासकामे कचारगड परिसरात झालेली आहे. यात्रेत भाविकांना समस्यांच्या सामना करावा लागू नये असे त्यांनी सांगितले.
आ. पुराम म्हणाले, यात्रेदरम्यान दिवसा पोलिसांचा बंदोबस्त असतो मात्र रात्रीला पोलीस कमी असतात. कचारगड येथे सभागृह बांधण्यासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यात्रेदरम्यान सभागृह बांधकामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाने आदिवासी बांधवांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल यात्रेदरम्यान लावावे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, यात्रा असल्यामुळे आणि देशातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येत येत असल्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. विविध यंत्रणांवर जबाबदारी सोपविली आहे. बेवारटोला प्रकल्पातून ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान नाल्यात पाणी सोडण्यास आपली तत्वता मान्यता असल्याचे सांगितले. यात्रेसाठी जिल्हा निधीतून ३ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
१४० कर्मचारी कार्यरत
यात्रेच्या तयारीच्या दृष्टीने तालुका प्रशासनाची ८ जानेवारीला सभा घेण्यात आली. तालुका पातळीवरील १२ विभागांचा सहभाग यात्रा यशस्वीतेसाठी राहणार आहे, असे तहसीलदार सांगळे यांनी सांगितले. योग्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. भाविकांसाठी मदत केंद्रही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कचारगड यात्रेदरम्यान २० अधिकारी व १२० कर्मचारी दोन पाळीमध्ये कर्तव्यावर राहणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे सालेकसा पोलीस निरिक्षक खंदारे यांनी सांगितले.
पाण्याची करणार तपासणी
यात्रेदरम्यान धनेगाव येथे वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. रु ग्ण तपासणी, पाणी तपासणी करण्यात येईल. यात्रेदरम्यान अन्न विषबाधा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. स्टॉलधारकांना याबाबत कळविणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.येरणे यांनी सांगितले. भाजपचे महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी यात्रेदरम्यान महिला भाविकांसाठी मोबाईल शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी केली.