मिरवणुकांवरील अनावश्यक खर्च टाळलाच पाहीजे

By Admin | Published: September 15, 2016 12:22 AM2016-09-15T00:22:28+5:302016-09-15T00:22:28+5:30

मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल-ताशे, आतिषबाजीने कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. या बाबी आवश्यक तेवढ्याच वापरून

Avoid unnecessary expenditure on procurement | मिरवणुकांवरील अनावश्यक खर्च टाळलाच पाहीजे

मिरवणुकांवरील अनावश्यक खर्च टाळलाच पाहीजे

googlenewsNext

लोकमत परिचर्चेतील सूर : सामाजिक भान आणि उत्सवातील पावित्र्य जपणे गरजेचे
गोंदिया : मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल-ताशे, आतिषबाजीने कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. या बाबी आवश्यक तेवढ्याच वापरून मिरवणुकांमधील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळांनी पुढाकार घेतला पाहीजे, असा सूर ‘लोकमत परिचर्चे’त गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
लोकमत कार्यालयात झालेल्या या चर्चेत छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबक जरोदे, उपाध्यक्ष संजय कुंभलवार, अपना गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अरविंद तिवारी, संरक्षक दीपक अग्रवाल, शिवकृपा गणेश उत्सव मंडळाचे अतुल ढाले, अमर मिश्रा तसेच पोलीस विभागाच्या वतीने वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहभागी झाले होते.
विसर्जन मिरवणुकांमधील अनावश्यक खर्च, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे आणि मानवी नुकसान, आवाजाच्या मर्यादेचे होणारे उल्लंघन, मिरवणुकीतील बडेजावपणासाठी केला जाणारा खर्च वाचवून समाजप्रबोधनपर देखाव्यांना प्राधान्य कसे देता येईल, अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष सहभागी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बजेजावपणा नको, उत्सवाचे पावित्र्य जपत त्याला गालबोट लागणारे कोणतेही कृत्य आमच्या मंडळाकडून घडणार नाही, याची दक्षता घेण्याची ग्वाही दिली.
पर्यावरण विभागाच्या नियमांचे आमच्याकडून दरवर्षीच पालन केले जाते. शिवाय सामाजिक भान ठेवत मंडळाकडून ३ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. १२ वर्षापूर्वी पूरपिडीतांना मदत केली होती, असे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाचे त्र्यंबक जरोदे यांनी सांगितले. अरविंद तिवारी म्हणाले, आमचे गणेश मंडळ सजावटीला प्राधान्य देते. दररोज १० दिवस महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसादाचा लाभ ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना होतो. त्यांना हॉटेलमधून पदार्थ विकत घेणे शक्य नसते. तेवढाच त्यांना दिलासा मिळतो. याशिवाय शहरात राहणारे विद्यार्थी, केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयातील रूग्णांचे नातेवाईक यांना यामुळे मोठा आधार वाटतो, असे अग्रवाल म्हणाले.
डिजेच्या तालावर सिनेगीत वाजविणे टाळावे, गाण्यांमधूनही भक्तीभाव प्रकट व्हावा यासाठी आमचा प्रयत्न राहात असून गुलाल उधळणे आम्ही बंदच केल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मिरवणूक काढताना मंडळाच्या लोकांनी रहदारीला बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, रुग्णवाहिकेसाठी जागा मोकळी करावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे म्हणाले. गणेश मंडळांनी आपल्या मंडळांचा आदर्श समाजासमोर उभा राहील असे काम करावे, असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)

१४ संवेदनशील ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी एक
गणेशोत्सव उत्सवात जातीय जंगल महाराष्ट्रात यापूर्वी झाल्या आहेत. जातिय दंगल होणाऱ्या राज्यातील १४ संवेदनशिल ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी हे एक ठिकाण असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने दंगलीने धगधगणाऱ्या सडक-अर्जुनी या गावाला शांत केले. तरीही या गावाकडे शासनाचे लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
आवाजाची मर्यादा वाढवून द्या किंवा शिथिलता द्या
सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा ७५ डेसीबलपेक्षा जास्त नको असे नियम आहेत. परंतु ७५ डेसीबल आवाजात कोणताही डिजे बसत नाही. गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असताना आवाजाच्या या मर्यादेचे काटेकोर पालन केल्यास एकाही मंडळाला मिरवणूक काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे किमान विसर्जनाच्या दिवशी आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, किंवा नियमात शिथिलता द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली.

ही आहेत विसर्जन स्थळे
शहरातील काही गणेश मंडळांकडून रजेगाव येथे गणपती विसर्जन केले जाते. शिवाय पांगोळी नदी, खमारी व छोटा गोंदिया, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव, गौरीनगर नाला, छोटा गोंदिया तलाव, साई मंदिर नाग तलाव, मुर्री गावतलाव व टेमनीघाट या ठिकाणी सार्वजनिक मंडळ व खाजगी गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.
राहणार चोख बंदोबस्त
बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलिसांनी मंडळांना दिवस वाटून दिलेच आहेत. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान शहरात शांतता व व्यवस्था कायम रहावी यासाठी चोख बंदोबस्त राहणार आहे. याकरिता पोलिसांनी होमगार्ड मागवून घेतले आहेत. शिवाय वाहतूक विभागाचे व पोलीस ठाण्यांतील कर्मचारी राहतील.

Web Title: Avoid unnecessary expenditure on procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.