पाण्याचा अपव्यय टाळा
By Admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:11+5:302016-04-03T03:51:11+5:30
पृथ्वीतलावर सागर, महासागरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असले तरी मानव व इतर प्राणीमात्रांना हवे असलेले पाणी अत्यल्प आहे.
आवाहन : जलजागृती साक्षरता कार्यक्रम
इटखेडा : पृथ्वीतलावर सागर, महासागरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असले तरी मानव व इतर प्राणीमात्रांना हवे असलेले पाणी अत्यल्प आहे. पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती करणे अशक्य आहे. पाऊस पडत नसल्याने देशाच्या कोणत्यातरी भागात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याअभावी माणसे, पशुपक्षी व पिकांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यये टाळणे आता गरजेचे आहे.
दुष्काळ पडला की सर्वत्र बोंबाबोंब सुरू होते. पाण्यासाठी माणसांमध्ये भांडणे व हाणामाऱ्या होत आहेत. जंगल परिसरातील पाण्याचे साठे आटल्यामुळे जंगली प्राणी मनुष्यवस्तीवर आक्रमण करीत आहेत. भविष्यात पाण्यासाठी युद्धे होतील. मानवी जीवनावर विघातक परिणाम होणाऱ्या गंभीर बाबींची दखल घेण्याची गरज निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने जनतेमध्ये जलजागृती करण्यासाठी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले.
त्या अन्वये समृध्दी पाणी वापर संस्था व ग्रामपंचायत इटखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कार्यक्रमात अतिथीनी सदर मनोगत व्यक्त केले. मर्यादीत स्वरूपात असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या गरजेवर भर दिला. पाण्याच्या अनिर्बंध गैरवापरामुळे पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांमध्ये जलजागृती व जलसाक्षरता निर्माण व्हावी व पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मनोहरराव चंद्रिकापुरे, पं.स. उपसभापती आशा झिलपे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच अस्मिता वैद्य, उपसरपंच वासुदेवराव उके, प्राचार्य लहू बोळणे, सुभाष देशमुख, इंद्रदास झिलपे, देवीदान पालीवाल, पुंडलिक धोटे, पोलीस पाटील विकास लांडगे, पुंडलिक धोेटे, शाखा अभियंता एस.व्ही. भवरे, समृध्दी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विलास भावे, सचिव विजय मेश्राम, मोरेश्वर गोंडाणे, शालिकराम भोयर, दामोधर चांदेवार, शालिकराम हुकरे, लिना येरणे, सुशिला गोंडाणे, चेतन शेंडे, प्रकाश रामटेके, तालुका कृषी अधिकारी मुनेश्वर, ए.एन. चव्हाण, सिध्दार्थ सुखदेवे, जे.एम. ठेंगरी यांच्यासह ग्रामस्थ बंधु-भगिनींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक माजी अध्यक्ष देविदान पालीवाल यांनी मांडले. संचालन करून आभार मोरेश्वर गोंडाणे यांनी मानले. ग्रामपंचायत, समृध्दी पाणी वापर संस्था, इसापूर, इटखेडा हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय व जि.प. प्राथमिक शाळा, ग्रामस्थ व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी जलजागृतीसाठी गावातील रस्त्यावरून पदयात्रा काढली.