७७ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:18+5:30
दिल्ली निजामुद्दीन येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात हाय अर्लट देण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथील प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेवून त्यांना शहरातील कुडवा परिसरातील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. शुक्रवारपर्यंत एकूण ५९ जणांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामुळे एकूण ७७ जणांच्या अहवालाची जिल्हा आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त होण्यास विलंब असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत सुध्दा वाढ झाली आहे.
दिल्ली निजामुद्दीन येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात हाय अर्लट देण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथील प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर सुरू केली आहे.
५६ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना कुडवा येथील आयुर्वेदीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. तर शहरातील गणेश नगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण १९ जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे नमुने सुध्दा तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आहे.
हे सर्व मिळून एकूण ७७ जणांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. तर दिल्ली निजामुद्दीन प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे नागपूर येथील मेयो येथील प्रयोगशाळेतील मशिनमध्ये शुक्रवारी काही तरी बिघाड आला होता. त्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
१६६ व्यक्ती होम क्वारंटाईन
जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत २५१ प्रवाशी विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आले. त्यांच्या संपर्कात ९४५ व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्या सर्वांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण आले होते. २१८ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या १६६ व्यक्तींचा १४ दिवसाचा वास्तव्याच्या ठिकाणी अलिगकरणाचा कालावधी संपलेला आहे. ४ एप्रिलपर्यंत विदेशातून प्रवास करून आलेल्या ३३ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या १६६ व्यक्ती वास्तव्याच्या ठिकाणी अलिगकरणामध्ये आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाची देखरेख आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत ९५ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १७ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ७७ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.