३८ वर्षांपासून ‘त्यांचे’ मनोरंजनातून प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:40 PM2018-01-04T21:40:11+5:302018-01-04T21:40:28+5:30
जिल्ह्यात अनेक प्रतिभावान कलावंत आहे. त्यामुळे झाडपट्टीतील लोककलेची सर्वत्र दखल घेतली जाते. असा एक कलावंत जिल्ह्यात असून मागील ३८ वर्षांपासून ते मनोरंजनातून प्रबोधनाचे काम करित आहे. त्यांच्या ३८ वर्षातील प्रवासाचा उलगडा त्यांनी लोकमतशी बोलताना केला.
देवानंद शहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात अनेक प्रतिभावान कलावंत आहे. त्यामुळे झाडपट्टीतील लोककलेची सर्वत्र दखल घेतली जाते. असा एक कलावंत जिल्ह्यात असून मागील ३८ वर्षांपासून ते मनोरंजनातून प्रबोधनाचे काम करित आहे. त्यांच्या ३८ वर्षातील प्रवासाचा उलगडा त्यांनी लोकमतशी बोलताना केला.
सन १९६९ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षीच झाडीपट्टी लोककलांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्यास सुरू करणारे लोकशाहीर हिंमतराव यावलकर हे सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोसमतोंडी येथील रहिवासी आहेत. वयाची ६७ वर्षे पूर्ण झाल्यावरही त्यांचे गोंदिया व भंडारा जिल्ह्यात झाडीपट्टी लोककलांच्या माध्यमातून सातत्याने मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.
झाडीपट्टी लोककलेच्या क्षेत्रात यावलकर यांनी वयाच्या १८ व्या वर्षी प्रवेश केला. शाळेत असताना त्यांनी अनेक कविता व पोवाडे सादर केले. मुख्यत्वे नाटकांमध्ये स्त्री पात्राच्या भूमिका साकारल्या. त्यांनी स्वत:च्या मंडळाची निर्मिती केली. त्यात १० कलावंतांचा समावेश आहे. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील गोरेगाव, साकोली, लाखनी, सडक-अर्जुनी या तालुक्यांमध्ये खडी गंमत, तमाशा व भजने आदी लोककलांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न करित असल्याचे यावलकर यांनी सांगितले.
हुंडाबळी प्रथा, व्यसनमुक्ती, स्त्री भृणहत्या, स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम व पर्यावरण आदी विषयांचा अंतर्भाव त्यांच्या लोककलांमध्ये असतो. समाजातील कुप्रथा नष्ट व्हाव्या व समाजात जागृती घडून यावी. यासाठी त्यांनी नाटकात स्त्री पात्राच्या भूमिका साकारल्या. कुटुंब नियोजन, प्रौढ शिक्षण, हुंडा विरोध, वृक्षारोपण व एकात्मिक ग्रामीण विकास योजनांवर ठिकठिकाणी पोवाडे सादर केले. त्यांना सुरूवातीपासून खंदे शाहीर रामू मलदावाले यांचे मार्गदर्शन लाभले. सन १९९० नंतर त्यांचे तब्बल १० पोवाडे आकाशवाणीवरही प्रसिद्ध झाले आहे.
पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षातील आठ महिने ते मंडई व जलसामध्ये दंडार, तमाशा, भजन व पोवाडे सादर करून सामाजिक जागृती करीत आहे. त्यांच्या कार्यक्रमाला नागरिक भरभरून प्रतिसाद देतात. विशेष म्हणजे त्यांना कविता लेखनाची आवड आहे. त्यांनी आजपर्यंत जवळपास तीन हजार कवितांचे लेखन केले आहे. त्यापैकी काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत तर काही प्रसिद्ध व्हायच्या आहेत.
लोकशाहीर यावलकरांचे संपूर्ण कुटुंबच झाडीपट्टी लोककलांच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. त्यांची पत्नी इंदू व बहीण शकुंतला यांनी भजन मंडळ स्थापित केले असून त्या भजनांतून प्रबोधनाचे कार्य करतात. तर मुलगा मुरलीधर तबला व नाल या वाद्यांमध्ये पारंगत आहे. तर मुलगी हिमेश्वरी त्यांच्या प्रबोधनाच्या कार्यात सहकार्य करते. भाऊ प्रल्हादसुद्धा झाडीपट्टी लोककला सादर करणारे कलावंत आहेत.
कलावंतांच्या हक्कासाठी धडपड
लोकशाहीर यावलकर हे विदर्भ शाहीर कलाकार परिषद गोंदियाचे सचिव आहेत. शासनाने कलावंतांना वाव द्यावा व झाडीपट्टीतील कलांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. कलाकारांना १५०० रूपये महिना असे अत्यल्प मानधन मिळते. ते तुटपुंजे असून त्यात वाढ करून तीन हजार रूपये मानधन वयोवृद्ध कलावंतांना मिळावे, अशी शासनाने व्यवस्था करावी. तसेच मार्च २०१७ पासून कलाकारांचे मानधन प्रलंबित आहे. ते मानधन शासनाने त्वरित द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
यावलकरांची गाजलेली नाटके
अनेक पुरस्कार मिळविणारे लोकशाहीर हिंमतराव यावलकर यांनी अनेक नाटकांत भूमिका साकारल्या असून त्यांच्या स्त्री पात्राच्या भूमिका विशेष गाजल्या. यात १९७० मध्ये तंट्याभिल्ल नाटकात गैजाची भूमिका, १९७८ मध्ये वच्छला हरणमध्ये रेवती, १९७९ मध्ये स्वर्गावर स्वारीमध्ये कयाधू, दामाजी पंत नाटकात विठ्ठल व द्रौपदी वस्त्रहरणमध्ये दौपदीच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.