फक्त छायाचित्रापुरतीच जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:25+5:30
एकदाच वापरात येत असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंवर राज्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र प्लास्टीक वस्तंूचा वापर सुरूच असून त्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहा आठवड्यांचा ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यंदा सहा आठवड्यांचे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात प्लास्टीक बंदीबाबत ११ सप्टेंबरपासून जनजागृती करावयाची आहे. मात्र नगर परिषदेला १० दिवसांनंतर जाग आली असून शुक्रवारी (दि.२०) एक कार्यक्रम घेण्यात आला. मात्र हा कार्यक्रमात फक्त छायाचित्रा पुरताच जनजागृतीचा असल्याचे बोलल्या जाते.
एकदाच वापरात येत असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंवर राज्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र प्लास्टीक वस्तंूचा वापर सुरूच असून त्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहा आठवड्यांचा ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा पहिला टप्पा ११ सप्टेंबरपासून सुरू करायचा होता. यासाठी महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्याकडून राज्यातील सर्वच नागरी संस्थांना ३१ ऑगस्ट रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार, गोंदिया नगर परिषदेनेही ११ सप्टेंबरपासून शहरात प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करणे अपेक्षित होते. मात्र नगर परिषदेला याचा विसर पडला असे दिसून येत आहे. कारण नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२०) मालवीय शाळेत सफाई कर्मचारी व परिसरातील नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेतल्याची माहिती आहे. म्हणजेच, पहिल्या टप्प्यातील १० दिवस लोटल्यानंतर नगर परिषदेला जाग आल्याचे दिसते.
या कार्यक्रमात सफाई कर्मचारी व नगर परिषद अधिकारी-कर्मचारीच जास्त होते अशी माहिती आहे. एकंदर, शासनाचे आदेश असल्याने व त्यातही हा प्रकार आता अंगलट येणार असल्याचे पाहून फक्त फोटो काढण्यापुरताच हा कार्यक्रम घेण्यात आला.
असे आहेत अभियानातील तीन टप्पे
‘स्वच्छता ही सेवा’अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात, ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावयाची आहे. दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून शहरात श्रमदान करून प्लास्टीक कचरा गोळा करण्याची मोहीम राबवायची आहे. तर तिसऱ्या टप्प्यात, ३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान गोळा केलेला प्लास्टीक रिसायकलींगसाठी पाठवायचा आहे.
टार्गेट प्लास्टीक मुक्त दिवाळी
आजघडीला सर्वांनाच प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीकच्या वस्तू वापराची सवय जडली आहे. मात्र प्लास्टीकच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.त्यात आता दिवाळी तोंडावर आली असून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने प्लास्टीकचा कहर होणार. मात्र यंदा प्लास्टीक साहित्यांचा वापर न करता पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावता यावा, हे शासनाचे उद्दिष्ट आहे.यातूनच यंदा प्लास्टीक मुक्त दिवाळीचे शासनाचे टार्गेट आहे.