कुऱ्हाडी - बोरगाव रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:18+5:302021-08-12T04:33:18+5:30
गोरेगाव : तालुक्यातील कुऱ्हाडी ते बोरगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले ...
गोरेगाव : तालुक्यातील कुऱ्हाडी ते बोरगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली असून रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने समस्या कायम आहे.
कुऱ्हाडी येथे शाळा, काॅलेज, बँक, दवाखाने असल्याने बोरगाव, सुकपुर, चोपनटोली, चौकी टोला येथील नागरीक, विद्यार्थी येथे ये-जा करतात. हाच रस्ता गोंदियाला जात असल्याने नागरिक, विद्यार्थी यांची सातत्याने वर्दळ असते. मात्र या सर्वांनाच खड्ड्यांमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून डबके तयार झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा केली पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. लोकप्रतिनिधींचे सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चोपन टोली गावाजवळ खड्डा पडला असल्याने तंटामुक्त समिती सुकपुरचे अध्यक्ष अशोक शेंडे यांनी पुढाकार घेत या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना होणारी समस्या लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडली. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.