अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद उपचार पध्दतीची जोपासना व्हावी

By अंकुश गुंडावार | Published: February 11, 2024 07:59 PM2024-02-11T19:59:34+5:302024-02-11T19:59:43+5:30

उपराष्ट्रपती जगदीप धनखड : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन

Ayurveda, a valuable cultural heritage, should be cultivated: Jagdip Dhankhar | अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद उपचार पध्दतीची जोपासना व्हावी

अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद उपचार पध्दतीची जोपासना व्हावी

गोंदिया : देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना होण्याची गरज असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी (दि.११) कुडवा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम.रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरेटे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर व अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे उपस्थित होते. उपराष्ट्रपती म्हणाले आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नागरिकांना उपचारासाठी केवळ आर्थिक मदत नव्हे तर या माध्यमातून आरोग्यविषयक संपूर्ण सेवा अत्यंत प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेद हा देशाचा मोठा सांस्कृतिक वारसा असून त्यात मोलाचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे.उत्तम आरोग्याची जपणूक करून आपण नव्या भारताच्या निर्मितीत योगदान देऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. योगविद्येच्या माध्यमातून भारताने जगाला एक मोठी देणगी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग पोहोचला असल्याचे सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणार

महाराष्ट्रात सध्या २५ जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर अजुन ११ मेडिकल कॉलेज उभारण्यात येतील. तसेच जिल्हास्तरावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी मदत होईल. औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली असून अतिरिक्त दराने औषध विक्रीला चाप बसला आहे. गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची नागरिकांची मागणी पूर्ण झाली असून नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 

६९० कोटींच्या निधीतून या महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधेंसह ४०० बेडची क्षमता राहणार आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५० विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.
- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री,


वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी गोंदिया येथील विद्यार्थ्याना नागपूर येथे व दूरवर जावे लागत होते. परंतु आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून ही पायपीट दूर झालेली आहे. यामुळे वेळे व पैशांची बचत झाली आहे. या नवीन इमारतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील १३ लाखांवर नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळेल.

- प्रफुल्ल पटेल, खासदार.

Web Title: Ayurveda, a valuable cultural heritage, should be cultivated: Jagdip Dhankhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.