बाबासाहेबांना डोक्यावर नाही, त्यांचे विचार डोक्यात घ्या!
By Admin | Published: January 23, 2016 12:25 AM2016-01-23T00:25:45+5:302016-01-23T00:25:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली.
सुभाष खंडारे : बाबासाहेबांनी आचरणातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
देवानंद शहारे गोंदिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली. धम्माच्या पंचशीलातील पाचवे तत्त्व ‘सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणि सिक्का पदमं समाजिदयामि’ म्हणजे मी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो, असे आहे. यावरून बाबासाहेबांची व्यसनमुक्त समाजाची दूरदृष्टी स्पष्ट होते. त्यामुळे बाबासाहेबांना डोक्यावर घेवू नका, तर त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे मार्गदर्शन वर्धा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे यांनी व्यक्त केले.
येथील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाबासाहेबांचे व्यसनमुक्तीबाबतचे विचार’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते.
डॉ.खंडारे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती संदर्भात कोणताही ग्रंथ लिहिला नाही. कोणत्याही संमेलनात व्यसनमुक्तीसंदर्भात भाषण दिले नाही. परंतु त्यांनी स्वत:च्या आचरणातून व्यसनमुक्तीचा संदेश जनतेला दिला. बाबासाहेबांना कुठलेही व्यसन नव्हते. कारण त्यांनी केलेली व्यसनाची व्याख्याच आगळीवेगळी आहे. ती अशी, ‘ज्यामुळे माणसाला लाचारी येते, तो गुन्हेगार बनतो व शेवटी त्याचे अध:पतन होते, त्या निरंतर क्रियेला व्यसन असे म्हणतात.’
व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजासाठी बाबासाहेबांनी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी भगवान तथागत बुद्धांचा धम्म दिला. ज्यात स्पष्टपणे व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याची शक्ती आहे. दुसरे म्हणजे त्यांनी व्यक्तिविशेषाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. ज्यामुळे मनुष्य निर्भय होतो. त्यांच्या तीन दैवतांपैकी एक स्वाभिमान होते. तिसरी गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण हा आचरणाचा उत्कृष्ट पैलू बाबासाहेबांच्या जीवनातून येतो. ज्यामुळे दु:खमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. बाबाहेबांनी सांगितलेल्या या तीन विषयांची आज सर्वाधिक गरज आहे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रधान सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल उके यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार अमोल मडामे यांनी मानले.
आचरणातून पडतो प्रभाव
व्यसनमुक्तीबाबत कितीही चांगले मार्गदर्शन करण्यात आले तरी मार्गदर्शन करणारा जर स्वत: व्यसनी असेल तर त्याचा ऐकणाऱ्यांवर काहीही पडत नाही. मात्र मार्गदर्शन करणारा स्वत: व्यसनमुक्त असेल तर ग्रहण करणाऱ्यांवर प्रभाव पडतो. कृती व आचरणातून संदेश जाणे गरजेचे आहे, असे डॉ. खंडारे म्हणाले.