गंगाबाईतील २० बाळंतीणींना जंतू संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:30 PM2019-08-19T21:30:45+5:302019-08-19T21:31:32+5:30
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे गंगाबाई महिला रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मेडीकल कॉलेजच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे गंगाबाईतील बाळंतिनींना जंतू संसर्ग होत आहे. या पंधरवाड्यात २० बाळंतिनींना जंतू संसर्ग झाला असून एकीला प्राणास मुकावे लगले आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे गंगाबाई महिला रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मेडीकल कॉलेजच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे गंगाबाईतील बाळंतिनींना जंतू संसर्ग होत आहे. या पंधरवाड्यात २० बाळंतिनींना जंतू संसर्ग झाला असून एकीला प्राणास मुकावे लगले आहे.
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात पावसाळ्याच्या दिवसांत वॉर्डमध्ये पाणी साचत होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्या वॉर्डातील फर्शची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात व यासाठी वॉर्डची तोडफोड करण्यात आली. आठ दिवसांसाठी रूग्णांना त्या वॉर्डातून हलविण्यात आल्याचे सांगितले मात्र महिना लोटूनही काम पूर्ण न झाल्याने या वॉर्डातील बाळंतीणींना अतिदक्षता कक्षाला प्रसूती पश्चात कक्षात परिवर्तीत करून तेथे ठेवले जात आहे. ज्या वॉर्डात फक्त आठ किंवा १० रूग्णांना ठेवण्याची व्यवस्था होती, तेथे जागेअभावी ४० रूग्ण ठेवले जात असल्याने जंतूसंसर्गाचा धोका सहाजिकच आहे.
परंतु गंगाबाई स्त्री रूग्णालयात ज्या २० महिलांना जंतू संसर्ग झाला त्या महिलांची प्रसूती करताना टाके लावायला जास्तीतजास्त २० मिनिटांचा कालावधी लागतो. तेथे शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरांनी तब्बल दोन-दोन तासांचा वेळ घेतल्यामुळे त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाºया कापडांचे निर्जंतूकीकरण करण्यात आले किंवा नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आठ महिन्यांपासून बहुतांश औषधांचा तुटवडा आहे.
प्रसूती झालेल्या महिलांना कोणत्या कंपनीचे अॅन्टीबायोटीक औषध देण्यात येते हे देखील कारण आहे. गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या परिसरात बेवारस कुत्रे व डुकरांचा हैदोस असतो. पावसाळ्यामुळे ओले कापड शस्त्रक्रियेदरम्यान जंतू संसर्गाला वाव देत असतात. शस्त्रक्रिया करतांना २० मिनीटांच्या जागी डॉक्टरांनी दोन-दोन तास घालविल्यामुळे बाळंतिनींना मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. त्या डॉक्टरांवर काय कारवाई होणार असा सवाल रूग्णांचे नातवाईक करीत आहेत.
१० महिलांवर अजूनही उपचारच
गंगाबाईतील घाण व डॉक्टरांची उदासिनता यामुळे बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील २० महिलांना जंतू संसर्ग झाला आहे. त्यापैकी सर्व महिलांची काळजी घेणे सुरू झाले आहे. टाके पिकलेल्या २० पैकी १० महिलांच्या टाक्यांची ड्रेसिंग केल्याने त्यांचे टाके वाळले परिणामी त्या १० महिलांना घरी जाण्यासाठी सुटी देण्यात आली. परंतु १० महिला आजही गंगाबाईत पिकलेल्या टाक्यांचा उपचार घेत आहेत. त्यात राणी गौतम (२२,तांडा), बबीता रामू कोरे (३२,रा. मेंढा), सिमा ब्रजकिशोर तिवारी (२६,रा. चारगाव), कविता सतीश ब्राम्हणकर (२६,रा. खमारी), प्रतिमा राधेश्याम मेश्राम (२५,रा. गोरेगाव), गुनेश्वरी संतोष मेश्राम (२३,रा. भडंगा), दिपीका अरविंद शिंगाडे (२६,रा. पालेवाडा), प्रियंका नंदराम अमृते (२६, रा. खमारी), भुमेश्वरी ईश्वर येरणे (२३, रा. लोहारा) व कमलेश्वरी दिनेशकेकती (२६,रा. काचेवानी) यांचा समावेश आहे.
अश्वीनीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा
आमगाव तालुक्यातील ग्राम किडंगीपार येथील अश्वीनी भरत कठाणे या महिलेची शस्त्रक्रिया ६ आॅगस्ट रोजी पहाटे २.३८ वाजता झाली. तिची प्रसूती डॉ. गरीमा बग्गा यांनी केली. त्यांनी या प्रकरणात दुर्लक्ष केल्यामुळे अश्वीनीला जंतू संसर्ग होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पती भरत कठाणे यांनी केला आहे. दोषींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊल उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
गंगाबाईतील प्रसूती आणि स्त्री रोग विभाग वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या अधिनस्त असल्यामुळे येथील समस्यांसंदर्भात अधिष्ठातांना अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु याकडे लक्ष देण्यात आले नाही.
- डॉ. सुवर्णा हुबेकर, अधीक्षक, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, गोंदिया.