कोरोनाकाळात बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:34 PM2021-09-16T13:34:13+5:302021-09-16T13:40:42+5:30

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये परिचरच नसल्यामुळे वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बंद असलेल्या शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे.

bad condition of zp schools building amid covid situation | कोरोनाकाळात बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली

कोरोनाकाळात बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली

Next
ठळक मुद्देउंदरांचे झाले आश्रयस्थान, शाळा परिसरात वाढलेल्या गवतावर जनावरांचा वावर

गोंदिया : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी घरी आहेत. कोरोनामुळे शाळेला लागलेल्या कुलूपावर गंज चढली. परंतु शाळा काही उघडण्याचे नाव घेत नाही. खासगी शाळा बंद असल्या तरी त्या शाळांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. परंतु जिल्हा परिषद शाळेत परिचरच नसल्याने बंद असलेल्या शाळांची दैना परिस्थिती झाली असून वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बंद असलेल्या शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेत जागा जागा शोधून घेतली आहे. 

मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या वर्ग खोल्या पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये साप आणि विंचवांचा वावर सुरू झाला तर परिसरात कंबरेएवढे गवत वाढून सर्वत्र कचरा जमा झाला. ज्या शाळेला आवारभिंत नाही किंवा आवारभिंत असूनही गेट नाही, अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन चरत असतात. बंद असलेल्या जि. प. शाळांत साप, विंचवांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांना व शाळेच्या आवारात खेळणाऱ्या बालकांना याचा धोका आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना -

वर्गातील डेस्क, बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे अशी या शाळांतील वर्गखोल्यांची विदारक परिस्थिती आहे.


जबाबदारी कुणाची?

शाळांत वाढलेला कचरा, साप, विंचवांनी पकडलेली जागा, याला शाळा प्रशासन जबाबदार असले तरी शाळेत असलेले परिचरपद शासनाने कमी केल्याने वर्गखोल्यांमध्ये जमलेली धूळ आता मुख्याध्यापकांनी स्वच्छ करावी का, हा प्रश्न उपस्थित होतो.

शाळेत साठलेला कचरा काढण्यासाठी किंवा बंद असलेल्या शाळा सुसज्ज करण्यासाठी शासनाने निधी दिलेला नाही. या शाळेची स्वच्छता करण्यापासून शाळेचे साहित्य निकामी झाले. त्याची दुरूस्ती करण्याचा भार मुख्याध्यापकांवरच टाकला जातो. मुख्याध्यापक आपल्या जवळून शाळेला सजविण्यासाठी किती पैसे खर्च करणार?

शिक्षकांची उपस्थिती किती?

इयत्ता ८ ते १२ वीच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू आहेत. परंतु वर्ग १ ते ७च्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू नसली तरी शाळा शिक्षकांसाठी सुरू आहेत. आता सर्वच शाळांत शंभर टक्के शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे पत्र शिक्षण विभागाने २७ ऑगस्ट रोजी काढले आहे.

आकडेवारी काय सांगते

तालुका         --      जि.प. प्राथमिक शाळा        --           शिक्षक संख्या

आमगाव       --         ११०                                --          ३९७
अर्जुनी-मोरगाव  --    १३२                               --          ४१८

देवरी                 --     १४२                              --          ३७४
गोंदिया              --    १८८                               --          ८२५

गोरेगाव             --     १०८                            --           ३७९
सडक-अर्जुनी    --     १०९                           --            ३५४

सालेकसा           --     ११२                          --             ३४०
तिरोडा               --     १३८                         --             ४७९

शाळेला सुसज्ज करण्याचे काम शिक्षण विभाग करेल -

बहुतांश शाळांच्या इमारती पक्क्या आहेत. सिमेंट काँक्रिटने बेस तयार केला आहे. त्यामुळे उंदीर, साप, विंचू शाळेच्या आवारात शक्यतो येणार नाहीत. काही शाळांमध्ये हा प्रकार दिसून येत असेल तर त्या शाळेला सुसज्ज करण्याचे काम आमचा शिक्षण विभाग करेल. सध्या शाळा बंद आहेत. शाळेत शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती आहे.

- के. वाय. सर्याम, शिक्षणाधिकारी, गोंदिया

Web Title: bad condition of zp schools building amid covid situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.