विश्व उत्कृष्ट बुध्दिस्ट नेतृत्व पुरस्काराने बडोले सन्मानित
By admin | Published: February 28, 2016 01:46 AM2016-02-28T01:46:38+5:302016-02-28T01:46:38+5:30
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना २३ फेब्रुवारी रोजी थायलंड येथील...
गोंदिया : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना २३ फेब्रुवारी रोजी थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट संस्थेतर्फे ‘दी वर्ल्ड बुध्दीस्ट आउटस्टेंडिग लीडर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ना. बडोले यांच्या बौद्ध समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या जागतिक स्तरावरच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. ना. बडोले हे थायलंड येथे २२ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसीय समारंभात सपत्निक उपस्थित होते. विश्वस्तरावर थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट संस्था १०० हून अधिक विद्यापीठ तसेच ५ हजाराहून अधिक सक्रिय सदस्यांच्या माध्यमातून अंतर्गत शांती शिक्षण व धुम्रपान, मद्यपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर कार्य करीत आहे.
मागील ३३ वर्षापासून ही संस्था सकारात्मक व्यवहार बदलात सहभाग, राष्ट्रीयत्व व सार्वभौमता या नैतिक मूल्यांवर कार्य करीत असून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व विश्वस्तरीय उत्कृष्ट बुध्दीस्ट नेतृत्व करणाऱ्यांचा सन्मान करते.
ना. राजकुमार बडोले यांच्या जागतिक स्तरावरील या सन्मानाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)