आज पोळा; उत्सव सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:36 PM2024-09-02T15:36:15+5:302024-09-02T15:38:10+5:30

Gondia : शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल.

'Bail Pola' -A festival expressing gratitude to the bullock | आज पोळा; उत्सव सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण

'Bail Pola' -A festival expressing gratitude to the bullock

विजय मानकर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
सालेकसा :
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त गावागावांत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे. या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते.


कृषी कार्यात हजारो वर्षांपासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाच्या ठरलेला आहे. त्यात शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्त्वाचा राहिलेला आहे. शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राच्या वापर वाढला असला तरी छोट्या शेतकऱ्यांना प्रत्येक बाबतीत यंत्राच्या साह्याने शेती करणे महागात पडत असते. म्हणून आजही गावागावांत पाच एकरपर्यंत शेती असलेले छोटे शेतकरी आपल्या घरी वर्षभर किमान एक बैलजोडी ठेवून त्यांच्या भरवशावर शेती करतात. अशात शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल.


वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावास्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो. या दिवशी बैलांकडून कोणतेही कामे केली जात नसून त्यांना अंघोळ करून वेगवेगळ्या पद्धतीने सजवून पुरणपोळी खाऊ घालून पूजा केली जाते.


असा साजरा होतो सण 
पोळ्याचा सण श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावास्येच्या दिवशी येत असून, या दिवशी शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलांना नदीवर किवा तलावात नेऊन चांगल्या पद्धतीने धुऊन घरी आणतो. या दिवशी बैलांना खांद्यावर किंवा जखमा असलेल्या ठिकाणी हळद आणि तुपाचा लेप लावला जातो. शेतकरी आपल्या जीवलग मित्र असलेल्या बैलांना आपल्या ऐपती- प्रमाणे सजवण्याच्यासाठी बाजारातून वेगवेगळे श्रृंगार साहित्याची खरेदी करून आणतो. बैलांना मारुतीच्या देवळासमोर नेऊन नमन करतो व घरी आणतो. शेतकऱ्याची कारभारीण ओवाळणी करीत बैलांना पुरणपोळी खाऊ घालते. नंतर बैलगडी आपल्या बैलांना गावात घरोघरी नेतो त्याला प्रत्येक घरी बोजारा दिला जातो.


अशी झाली परंपरेची सुरुवात 
धार्मिक आख्यायिकेनुसार एकदा भगवान शंकरांच्या मनात आले की, त्यांचे प्रिय वाहन नंदी त्यांना नेहमी सुख-दुःखात साथ देत असतात. त्यांची आपण ही एकदा तरी पूजा करावी, ही इच्छा भगवान शंकराने पार्वतीजवळ व्यक्त केली. पार्वतीने होकार दिल्यानंतर भगवान शंकराने श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावास्येच्या दिवशी नंदीची अंघोळ करून त्याला चांगल्या प्रकारे सजविले आणि माता पार्वतीने तयार केलेल्या पुरणपोळ्या नंदीला खाऊ घातल्या व तो दिवस पूर्ण नंदीसाठी समर्पित केला. तेव्हापासूनच दरवर्षी श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावास्येच्या दिवशी बैलपोळा साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली.

Web Title: 'Bail Pola' -A festival expressing gratitude to the bullock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.