Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 03:01 PM2022-08-26T15:01:17+5:302022-08-26T15:06:10+5:30

ग्रामीण भागात परंपरा कायम, तंत्रज्ञानाच्या जगात बैलपोळा होणार साजरा

bail pola special - sound of those folk songs echoes in the mind and heart through tradition | Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...!

Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...!

googlenewsNext

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी (गोंदिया) : अनेक वर्षे निघून गेली, अनेक परंपरा जातात-येतात; पण बळीराजाचा पोळा हा सण मात्र प्रत्येकाच्या मनात रुजलेला आहे. जगाचा पोशिंदा व त्याला इमाने इतबारे साथ देणारे ढवळ्या-पवळ्या बैलजोडी ही कष्टच करतात. या कष्टाची आठवण व जाणीव आजच्या दिवशी होतेच म्हणून पोळ्याच्या सणाची अनेक गावकुसातील लोकगीतांचा इतिहास उभा साक्षी आहे. म्हणूनच त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज हा परंपरागत आजही ग्रामीण भागात प्रत्येक माणसाच्या मनामनात गुंजत असल्याचे चित्र आहे.

अमावास्या श्रावणाची, आली घेऊन सणाला,

कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला...

आला आला शेतकऱ्यांचा, पोळाचा रे सण मोठा,

हाती घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा,

आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ...

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार..

अशा अनेक गीतांचा इतिहास या सणाला आहे. पोळा हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर-नाले, तलाव, ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चारायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तूप तेलाने शेकतात. याला ‘खांद शेकणे’ म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे देतात. असा हा मनाचा सुख-समाधानाचा पोळा हा सण आठवणीचा संग्रहच जपतो. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार करून सजविण्यासाठी अनेक साहित्य खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या मुख्य चौकाजवळील सीमेजवळच्या आखरावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, तासे नागरिक वाजतगाजत एकत्र आणल्या जातात.

शोध संस्कृतीचे

शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. प्रथमत: ज्या संस्कृतींमध्ये बैलाचा शेतीसाठी वापर झाल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत, त्या हडप्पा व मोहजोंदडो संसकृतीत याचा उगम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संशोधकांनी याचा अधिकचा शोध घेणे आवश्यक आहे.

बैलांप्रति व्यक्त केली जाते कृतज्ञता

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून, हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

तंत्रज्ञानाच्या युगात पोळ्याचे महत्त्व कायम

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा, तर पायात घुंगरू बांधतात.

Web Title: bail pola special - sound of those folk songs echoes in the mind and heart through tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.