बाल महोत्सवात अवतरले ‘बाजीराव मस्तानी’
By admin | Published: March 5, 2016 01:53 AM2016-03-05T01:53:12+5:302016-03-05T01:53:12+5:30
विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी देण्यासाठी सोमवारी लोकमत बालविकास मंचच्या वतीने गोंदियात ....
गोंदिया : विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी देण्यासाठी सोमवारी लोकमत बालविकास मंचच्या वतीने गोंदियात ‘बाल महोत्सवा’चे आयोजन केले होते. समूह नृत्य, एकल नृत्य तसेच जनजागृतीपर पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशही दिला. या महोत्सवातील सर्वाधिक नृत्य स्पर्धकांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गीतांवर जास्तीत जास्त नृत्य सादर केल्याने या महोत्सवात बाजीराम मस्तानीच अवतरल्याचा भास प्रेक्षकांना होत होता. प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी त्यांच्यात एकच पैज लागल्याचे दिसून आले.
सदर बाल महोत्सव बी.बी. पब्लिक स्कूल येथे थाटात साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला. ज्यात चंचलबेन मनिभाई पटेल हायस्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, लिटील फ्लॉवर कॉन्व्हेंट, शारदा कॉन्व्हेंट, सेंट झेव्हियर्स हायस्कूल, संस्कार कॉन्व्हेंट, एक्युट पब्लिक स्कूल, गोंदिया पब्लिक स्कूल, महर्षी विद्यामंदिर, मनोहर म्युनिसिपल स्कूल, विवेक मंदिर, बी.बी. पब्लिक स्कूल गोंदिया व अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती विद्यालय यासारख्या विद्यालयांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती देवी व स्व. जवाहरलाल दर्जा यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, रक्त संक्रमन अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, एस.एस. कोचिंग क्लासेसचे संचालक संजय शेंडे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, लोकमत इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजिका दिव्या भगत, अॅड. सुनीता पिंचा, बी.बी. पब्लिक स्कूलचे संचालक भूपेंद्र वैद्य, मुख्याध्यापिका एम.एम. शेख मंचावर उपस्थित होते.
स्वागत गीताद्वारे बाल महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांची समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यात वर्ग एक ते पाच साठी ‘अ’ गट व वर्ग सहा ते नऊ साठी ‘ब’ असे दोन गट पाडण्यात आले होते. समूह नृत्य स्पर्धेसाठी स्पर्धकांनी चांगलीच तयारी करून आल्याचे त्यांच्या सादरीकरणावरून दिसून आले. एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करण्यात आले.
यानंतर नाटिका स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. स्वच्छ भारत या विषयावर सेंट झेव्हियर्सच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत स्वच्छतेची जाणीव व महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शारदा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर आश्रीत नाटिका सादर केली. ज्यात व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम व त्यामुळे मानवी जीवन कसे नष्ट होते यावर प्रबोधनपर नाटिका सादर करून सामाजिक संदेश दिला. स्वच्छ भारत या विषयावर अतिसुंदर नाटिका बी.बी. पब्लिक स्कूलचे सादर केली. यात गांधी युग दाखवून महात्मा गांधीद्वारे दिलेल्या स्वच्छताविषयक संदेशांना मांडण्याचा प्रयत्न केला. अशा नाटिकेतून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
शेवटी एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. एकल नृत्य स्पर्धा सुरू होण्याआधी बालके एकल नृत्याचा सराव करताना दिसून आले. यात सहभागी झालेल्या बालकांनी आपल्या व्ययक्तिक कलागुणांना उजाळा दिला. तर एक्युट पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी गौरी बेले हिने तेजाब चित्रपटाच्या ‘एक-दो-तीन...’ या गीतावर बेभान होऊन नृत्य केले. तिच्या या नृत्यावर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रास्ताविक जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार व संचालन रामभरूस चक्रवर्ती यांनी केले. आभार जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी मानले. (प्रतिनिधी)