मोटारसायकल चोरींचा मोठा उलगडा बालाघाटचा चोरटा जेरबंद
By कपिल केकत | Published: January 7, 2024 07:29 PM2024-01-07T19:29:18+5:302024-01-07T19:29:39+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
गोंदिया: जिल्ह्यात विविध ठिकाणांवर घडत असलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणांचा मोठा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेचे बालाघाट येथून या मोटारसायकल चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेल्या सहा मोटारसायकल जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) ही कामगिरी केली असून, यानंतर आता आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणांवर मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. यावर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद करण्याबाबत आदेश स्थानिक गुन्हेचे निरीक्षक दिनेश लबडे यांना दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी (दि. ६) मोटारसायकल प्रकरणांतील चोरट्यांना शोधण्यासाठी तपास चक्रे फिरवित असता त्यांना रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत चोरीला गेलेली मोटारसायकल (एमएच ४९ एवाय ७५९५)ला विवेक उर्फ राजा नरेंद्र कनोजे (रा. गड्डामोहल्ला, जि. बालाघाट) व अतुल श्यामलाल बिसेन (रा. लिंगा, जि. बालाघाट) यांनी चोरली असून, अशा कित्येक मोटारसायकल चोरून विकण्यासाठी विविध ठिकाणी लपवून ठेवल्या असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली.
त्याआधारे पथकाने विवेक कनोजे याला त्याच्या बालाघाट येथील राहत्या घरातून मोटारसायकल (एमएच ४९ एवाय ७५९५) सह ताब्यात घेतले. पथकाने त्याची आपल्या पद्धतीने विचारपूस केली असता त्याने अतुल बिसेन सोबत गोंदिया, नागपूर, कामठी अशा विविध ठिकाणांहून मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. यावर पोलिसांनी विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या सहा मोटारसायकल जप्त केल्या. यातील मोटारसायकल (एमएच ४९ एवाय ७५९५) रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील असल्याने आरोपी व जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक लबडे यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार स. फौ. अर्जुन कावळे, हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार यांनी केली आहे.
या मोटारसायकल पोलिसांनी केल्या जप्त
- पोलिसांनी विवेक कनोजे याच्याकडून मोटारसायकल (एमएच ४९ एवाय ७५९५), (एमपी ४० एमएम ५३७८), (सीजी ०४ एलएस १२०९), बनावट क्रमांक असलेली (एमपी ५० एसए ३०५९), खरा क्रमांक (एमएच ४०० बीएन ४४२), (एमएच ४९ एवाय ५५५४), (एमएच ४० सी ४४०५), अशा दोन लाख ८० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.