रासायनिक खतासाठी आता मोजावे लागणार बळीराजाला हेक्टरी १७०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:30 AM2021-03-17T04:30:11+5:302021-03-17T04:30:11+5:30

गोंदिया : शेतीच्या लागवड खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने उत्पादन खर्च आणि हाती येणाऱ्या उत्पन्नाचे ताळमेळ करताना शेतकऱ्यांना चांगलीच ...

Baliraja will now have to pay Rs. 1700 per hectare for chemical fertilizer | रासायनिक खतासाठी आता मोजावे लागणार बळीराजाला हेक्टरी १७०० रुपये

रासायनिक खतासाठी आता मोजावे लागणार बळीराजाला हेक्टरी १७०० रुपये

Next

गोंदिया : शेतीच्या लागवड खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने उत्पादन खर्च आणि हाती येणाऱ्या उत्पन्नाचे ताळमेळ करताना शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती पाठोपाठ आता रासायनिक खताच्या किमतीमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून रासायनिक खतासाठी आता शेतकऱ्यांना हेक्टरी १७०० रुपये मोजावे लागणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा, ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अलीकडे रब्बी पिकाच्या लागवड क्षेत्रात सुध्दा वाढ झाली आहे. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १७०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत नाही. धान विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. विकलेल्या धानाचे पैसेही मिळत नाही. हाती आलेले पैसे मेहनतीच्या मानाने अतिशय तुटपुंजे असतात. त्यातच डिझेल आणि खतांची दरवाढ शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणारी ठरू शकते. पूर्वी शेतकरी शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु अलीकडे शेणखत मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करतात. खताची मात्रा दिली नाही तर शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

......

डिझेल दरवाढीने ट्रॅक्टर भाडे महागले

इंधनाच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने मशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पूर्वी ट्रॅक्टरचे मशागतीचे दर प्रति तास ६०० रुपये होते. परंतु आता ९०० रुपये प्रति तास झाले आहेत. एका एकराला नांगरणी पासून ते चिखलणी पर्यंत साडेतीन तास ट्रॅक्टर हवा असतो. पूर्वी २१०० रुपये एकरी खर्च यायचा. परंतु तो आता २९०० पर्यंत पोहोचला आहे. शेतकरी आता परंपरागत पद्धतीने बैलाच्या साहाय्याने मशागत करावी काय,अशा विचारात दिसत आहे.

......

वाढत्या किमतीमुळे बजेट बिघडले

डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शेतीशी निगडित बहुतांश कामे आता ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साह्याने केली जात आहे. मात्र दरवाढ झाल्याने शेतकरी आता परंपरागत पद्धतीने मशागत करण्याच्या तयारीत दिसत आहेत. खते, डिझेल तसेच इतर कृषी साहित्य दिवसेंदिवस महाग होत असल्याने शेतकऱ्यांचे बजेट बिघडत आहे.

.....

खत आधीचे दर आताचे दर (प्रतिबॅग)

१०:२६:२६ ११८५ १३८५

१५:१५:१५ १०४० १२००

१२:३२:१६ १२०० १३७५

२४:२४ १३०० १५००

२०:२०:००:१३ ९५० १२२५

डीएपी १२०० १४५०

.........

रासायनिक खताच्या किमती वाढल्याने आमचे गणित बिघडणार आहे. आधीच लागवड खर्चही निघत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादक अडचणीत आले आहेत. खताच्या किमती कमी करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गरज आहे.

- गणेश नागपुरे, शेतकरी लोधीटोला.

....

डिझेलचे दर वाढल्याने मशागत खर्चही वाढत आहे. शेतीचा दिवसेंदिवस खर्च वाढत असताना आता सर्वत्र महागाई दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला तीच किंमत मिळत आहे. यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय झाला आहे.

- पुंडलिक नागपुरे, शेतकरी, बुचाटोला

....

गोंदिया जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. धान पिकाला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. परंतु आता २०० ते २५० रुपये दरवाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडणार आहे. शासनाने खताचे दर तरी नियंत्रणात ठेवावे.

- लिखीराम नागपुरे, शेतकरी तिरोडा

.....

धानासह सर्वच पिकाला रासायनिक खताची गरज असते. शेतकरी रासायनिक खत विकत घेतात. मात्र अलीकडे वाढत्या किमतीने रासायनिक खत विकत घेणे शेतकऱ्यांसाठी कठीण जाईल. त्याचा परिणाम उत्पन्नावर होईल.

- अनिल मस्के, शेतकरी आसोली

Web Title: Baliraja will now have to pay Rs. 1700 per hectare for chemical fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.