रस्ता बांधकामासाठी एक महिन्यापासून गिट्टी पडून, मात्र कामाला सुरुवात केव्हा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:03 PM2024-05-03T16:03:36+5:302024-05-03T16:07:25+5:30
Gondia : आमगाव-सालेकसा मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; खड्डे बुजविण्याचे काम बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आमगाव-सालेकसा- दरेकसा मार्गाच्या दुरवस्थेकडे वारंवार शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर या मार्गाचे एकूण पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. त्यासाठी गिट्टी आणि बजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आली आहे. परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आमगाव- सालेकसा मार्गाची पुनर्बाधणी किंवा दुरुस्ती झाली नसल्यामुळे या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. याची वारंवार तक्रार केल्यानंतर आणि बातम्या प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम अधूनमधून केले. रस्त्यावरील खड्डे मुरूम मातीने बुजविण्यात आले. परिणामी आठ दिवसांतच रस्त्याची अवस्था 'जैसे थे' झाली. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच होते. अनेक अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली
आणि आमगाव ते दरेकसा दरम्यान पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. यात कावराबांध ते गोवारीटोला दोन किलोमीटर, पानगाव तलाव ते रॉढा एक किलोमीटर तसेच सालेकसा ते दरेकसा दरम्यान अर्धा अर्धा किलोमीटर वेगवेगळ्या ठिकाणी दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. असे एकंदरीत पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीसाठी गिट्टी आणि बजरी चुरी टाकण्यात आली. परंतु गिट्टी बजरी चुरी टाकल्यापासून एक महिना लोटला तरी प्रत्यक्षात रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाला नाही. गिट्टी बजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेसुद्धा अपघात होऊ लागले. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस जीवघेणे होऊ लागल्याने प्रवाशांचा त्रास आधीपेक्षा तीन पट वाढल्याचे चित्र आहे. रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असताना ते म्हणाले की रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. परंतु दुरुस्तीचे काम करण्यासाठी लागणारे मजूर वर्ग मिळत नसल्याने कामास विलंब होत असल्याचे सांगितले.
एवढ्या मोठ्या कंत्राटदाराला मजुरांची अडचण का?
आमगाव-सालेकसा-दरेकसा रस्ता दुरुस्तीचे काम वालिया अँड सन्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र, ही कंपनी रस्ता दुरुस्तीसाठी मजूर मिळत नसल्याचे सांगत कामास विलंब करीत आहे. मात्र, याचा फटका वाहन चालक आणि गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
खड्डे बुजविण्याची गरज
रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होत आहे म्हणून खड्डे बुजविण्याचे कामसुद्धा थांबविण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होताना दिसत नाही तर दुसरीकडे खड्यांची संख्या वाढत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे फार जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. परंतु बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार याकडे गांभीर्याने विचार करीत नसल्याचे चित्र आहे.