कार्यालयात आढळला बाँम्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:02 AM2017-10-15T00:02:21+5:302017-10-15T00:02:38+5:30
१३ आॅक्टोबर वेळ दुपारी ४ वाजताची. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी नेहमीप्रमाणेच आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त असताना अचानक ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १३ आॅक्टोबर वेळ दुपारी ४ वाजताची. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी नेहमीप्रमाणेच आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त असताना अचानक मेगा फोनवरुन सूचना करण्यात आली. ताबडतोब इमारत रिकामी करा, कुणीतरी बॉम्ब ठेवला आहे. या एकाच भितीने सर्व अधिकारी, कर्मचारी कामे अर्धवट टाकून इमारतीतील वेगवेगळ्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोरील भागात एकत्र झाले. कुणालाच काही कळेना. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला होता. प्रत्येकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवला असेल तर काय उपाययोजना केली पाहिजे याचेच प्रात्यक्षिक जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. हे कळल्यानंतर कर्मचाºयांनी सुटकेचा निश्वास: सोडला.
जर अशाप्रकारचे संकट वा आपत्ती आल्यास कशाप्रकारे दक्षता घेतली पाहिजे, याबाबतची माहिती प्रात्यक्षिकातून देण्यात आली. बॉम्ब शोधण्यासाठी बॉम्बशोध मोहिम राबविण्यात आली. बाँब सापडल्यानंतर त्याला निकामी कसे करायचे याची माहिती देण्यात आली. श्वान पथकाने बॉम्ब ठेवलेल्या ठिकाणी सापडलेल्या कपड्यावरुन कुणाचा हा कपडा आहे हे गर्दीत उभ्या असलेल्या व्यक्तीला श्वानाने शोधून काढले. इमारतीला आग लागल्यास कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवावे याचे प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. या आपत्ती निवारण प्रात्यक्षिकात पोलीस विभागाचे नितीन तोमर, रामकृष्ण अवचट, देविदास पडोळे, ओमराज जामकाटे, विजय लोनबळे, उमेश वानखेडे, मनोज वाढे यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसंरक्षक एस.युवराज, अदानी पॉवर प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सी.पी.साहू, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.