बँक कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 08:48 PM2018-05-30T20:48:19+5:302018-05-30T20:48:29+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनात सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनानंतर बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि.३०) संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनात सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनानंतर बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि.३०) संप पुकारला आहे.
सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या गोंदियातील मुख्य शाखेसमोर एकत्र येवून जोरदार निदर्शने व नारेबाजी केली. आपल्या मागण्यांसाठी देशभरातील १० लाखांपेक्षा अधिक कर्मचारी-अधिकारी दोन दिवसीय संपावर गेले आहेत. आयबीए व शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. वेतन वाढ व इतर मागण्यांबाबत आयबीएद्वारे विलंब केला जात आहे. तसेच अन्यायपूर्ण कार्यवाही केली जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या कार्यप्रणालीचा निषेध करण्यात आला. सरकारने मागण्या मंजुर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे. याप्रसंगी चंद्रप्रकाश रूहिया, पंकज शरणागत, विजय ठवरे, ओमप्रकाश बुरडे, एल.के. सिंग आदी नेत्यांनी संपात सहभागी कर्मचारी-अधिकाºयांना संबोधित केले. नवतपाच्या वाढत्या उष्णतेतही एक तासापर्यंत उन्हात नारेबाजी करीत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.
हा संप ३० व ३१ मे २०१८ या दोन दिवसांसाठी पुकारण्यात आला आहे. यात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचारी सहभागी झाले आहेत.जिल्हाध्यक्ष भास्कर राव, सचिव चंद्रप्रकाश रूहिया, पंकज शरणागत, विजय ठवरे, ओमप्रकाश बुरडे, एल.के. सिंग तसेच श्याम घाटे, अर्जुन ठाकूर, गणेश डडुरे, अनिल वैद्य, अश्विन राऊत, पृथ्वीराज भैसारे, राजू कदम, पी.बी. हटवार, राकेश कोल्हे आदी अनेक कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते.