बँक कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी असभ्य वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:30 AM2021-03-23T04:30:48+5:302021-03-23T04:30:48+5:30
परसवाडा : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच कर्मचारी ग्राहकांशी असभ्य वागणूक करतात. परिणामी बँकेचे ग्राहक ...
परसवाडा : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच कर्मचारी ग्राहकांशी असभ्य वागणूक करतात. परिणामी बँकेचे ग्राहक चांगलेच वैतागले असल्याचा आरोप केला आहे.
परिसरातील गावांसाठी ही एकमेव शाखा असून या शाखेचा संपर्क २५-३० गावांशी आहे. बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असून त्यामुळे ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाही. त्यातही कर्मचारी ग्राहकांशी असभ्य वागणूक करतात. बँकेतील पासबुक प्रिंट मशीन तसेच एटीएम बंद आहे. परिसरात छोटे-मोठे व्यापारी असून वेळेवर पैसा मिळत नसल्याने त्यांना ग्राहक सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो. परिसरातील गावातील वृध्दापकाळ, श्रावण बाळ, सजंय गांधी निराधार योजना लाभार्थी, शेतकरी, शेतमजूर, शाळेतील विद्यार्थी, बेरोजगार युवक व अन्य ग्राहकांना नाहक त्रास दिला जातो व पर्याय नसल्याने त्यांना सहन करावा लागतो. पासबुक प्रिंटसाठी दिवसभर ग्राहकांना बसविले जाते. तसेच प्रिंट बंद सांगून ग्राहकांना ५-१० किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. बँकेत दलालांच्या माध्यमातूनच कर्ज प्रकरण मंजूर केले जातात. कर्मचारी ग्राहकांना आपल्या मर्जीने बोलावून कामे करतात. या बँकेकडे जिल्हा अग्रणी बँकेने लक्ष देऊन ग्राहकांच्या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.