दुर्मिळ वृक्षांच्या बियाण्यांची तयार करणार बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:36 PM2018-01-04T21:36:36+5:302018-01-04T21:36:55+5:30
विदर्भात वनांचे प्रमाण सर्वाधिक असून यात अनेक महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वनस्पती आणि मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्षांच्या प्रजाती दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भात वनांचे प्रमाण सर्वाधिक असून यात अनेक महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वनस्पती आणि मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्षांच्या प्रजाती दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या दुर्मिळ वृक्षांच्या बियाण्यांची बँक आणि नर्सरी तयार करुन त्यांचे जतन करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे.
जुन्या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांनी ‘वृक्ष पेन्शन’ योजना राबविली. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. जुन्या वृक्षांचे संगोपन करणाऱ्या जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना पेन्शन रक्कमेचे वाटप नुकतेच करण्यात आले. या योजनेमुळे ७० ते ८० वर्षे जुन्या वृक्षांचे संर्वधन करण्यास मदत झाली. शेताच्या धुºयावरील अथवा रस्त्यालगत असलेल्या जुन्या वृक्षांचे संगोपन केल्यास भविष्यात त्याचा आर्थिक लाभ मिळेल अशी कल्पना सुद्धा शेतकºयांनी कधी केली नसेल. मात्र वृक्ष पेशंन योजनेमुळे त्यांना आर्थिक मदत झाली. गोंदिया जिल्ह्यात वनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या वनांमध्ये अनेक मौल्यवान व औषधीयुक्त वृक्षांचा समावेश आहे. मात्र या वृक्षांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने ती दुर्मिळ होत चालली आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करुन ते भावी पिढीला देखील उपयोगी पडावी, यासाठी या वृक्षांच्या बियाणांचे संकलन करुन त्यांची बँक तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या मदतीने दोन एकरवर या दुर्मिळ बियाण्यांची तीन रोपवाटिका तयार करुन लागवड करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा प्रशासन देणार आहे. बियाण्यांच्या संकलनाची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागावर सोपविण्यात आली आहे. दुर्मिळ बियाण्यांची बँक तयार केल्याने अनेक मौल्यवान वृक्ष व औषधयुक्त वनस्पतीचे जतन करणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा गोंदिया हा विदर्भातील एकमेव जिल्हा आहे.
रोपवाटिका व बागेत केवळ देशीच वृक्ष
अलीकडे नागरिकांचा व सरकारी कार्यालयांचा कल आकर्षक वाटणाºया विदेशी वृक्षांच्या लागवडीकडे आहे.यामुळे देशी वृक्षांचे संवर्धन आणि संगोपनाकडे दुर्लक्ष झाले आहे. हीच बाब हेरून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील बगिचे, सार्वजनिक बगिच्यात आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या नसर्रीत सुद्धा देशी प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. विदेशी प्रजातीच्या रोपट्यांची लागवड न करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.
१३५ दुर्मिळ वृक्षांची यादी तयार
सालेकसा तालुक्यातील दलदल कुही भागात अनेक दुर्मिळ वृक्ष वनस्पती आहेत. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या करु, पिवळा पळस यासारख्या १३५ वृक्षांच्या नावाची यादी जिल्हा प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी संस्थानी तयार केली आहे. या वृक्षांच्या बियाणांचे संकलन करुन त्यांची नर्सरी तयार करण्यात येणार आहे.
जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे वरदान मिळाले आहे. यात अनेक मौल्यवान वृक्ष असून त्यांचे संगोपन करण्यासाठी दुर्मिळ बियाण्यांची बँक आणि नर्सरी तयारी केली जाणार आहे.
- डॉ.अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी गोंदिया.