बँकांनी ८२ टक्के शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:08 PM2024-07-16T17:08:53+5:302024-07-16T17:10:36+5:30
म्हणे, शेतकऱ्यांची क्रेडिटच नाही : जिल्ह्यातील बँकाचा प्रताप, शेतकऱ्यांना ठेवले वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :शेती व्यवसाय हा सध्या नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे उधारी, उसनवारी करून शेतकरी आपली शेती करतो. मात्र, व्याजात शेतकरी आपली जमीनही घालवून बसतो. शेतकऱ्याला या चक्रातून काढण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना लागू केली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन हजार ५२३ शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डकरीता अर्ज केले. परंतु फक्त ६४४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेत अर्ज करणाऱ्या ८२ टक्के शेतकऱ्यांना बँकांनी क्रेडिट कार्ड दिलेच नाही.
एकीकडे शासन म्हणते शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड द्या, पण दुसरीकडे शासनाच्या या उपक्रमाची अंमलबजावणी बँका करत नाही तरीही 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशी अवस्था जिल्ह्यात आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना अंमलात आणते; परंतु योजना सुरू केल्यावर त्यांची अंमलबजावणी किती झाली, त्या योजनेत अडचण काय याकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांच्या सुरू केलेल्या योजना हवेतच राहतात.
कमी व्याजदरात शेतकरी हा पशुपालनासाठी तसेच शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करू शकतो. शेती व्यवसाय करताना अनेकदा शेतकरी हा सावकाराकडून उसने पैसे घेतात. मात्र, ते फेडताना शेतकरी व्याजाच्या चक्रात अडकतो. या फंदातून बाहेर काढण्यासाठी शासनाने किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना लागू केली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, कुक्कुटपालनासाठी दोन लाख, तर एक लाखापर्यंत पीक कर्ज दिले जाते. परंतु या योजनेला काळीमा फासण्याचे काम जिल्ह्यातील बँकांनी केले आहे. जिल्ह्यातील फक्त १८.२७ टक्केच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन हजार ५२३ शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डकरीता अर्ज केले. परंतु फक्त ६४४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला. शासन म्हणते योजना घ्या; परंतु बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हैस
किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, कुक्कुटपालनासाठी दोन लाख रुपये कर्ज दिले जाते, त्यामुळे शेतकरी शेतीसोबत जोडधंद्यातूनही उत्पन्न घेऊ लागला आहे. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड हे फायदेशीर आहे. शेती करताना मोठा खर्च करावा लागतो. यासाठी शेतकरी हा किसान क्रेडिट कार्डचा वापर करून एक लाखापर्यंत पीककर्जसुद्धा घेऊ शकतो.
शासन म्हणते योजना घ्या; बँकेकडून कर्ज मिळेना
शासन म्हणते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्या आणि त्या क्रेडिट कार्डच्या आधारावर गायी, म्हशींकरीता कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. परंतु क्रेडिट कार्डकरीता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी क्रेडिट कार्ड नाकारले आहे. शेतकऱ्यांचा सिबील स्कोअर बरोबर नसल्याने दिलेले कर्ज कसे फेडणार यासाठी प्रश्नचिन्ह उपस्थित करून बँकांनी कर्ज दिले नाही.