बँकांनी महिलांना स्वावलंबी करावे

By admin | Published: June 9, 2017 01:27 AM2017-06-09T01:27:57+5:302017-06-09T01:27:57+5:30

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती बचतगटातील महिलांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेणे त्यांना सोईचे होईल.

Banks should make women self-reliant | बँकांनी महिलांना स्वावलंबी करावे

बँकांनी महिलांना स्वावलंबी करावे

Next

संजय पुराम : प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती बचतगटातील महिलांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेणे त्यांना सोईचे होईल. बचतगटाच्या माध्यमातून महिला व्यवसायाकडे वळत आहेत. बचतगटातील महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी मुद्रा योजनेचा लाभ द्यावा, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व देवरी तहसील कार्यालयाच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.७) देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदीर येथे नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे होते. विशेष अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.सदस्य उषा शहारे, सरिता रहांगडाले, माजी सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, तहसीलदार विजय बोरुडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, खंड विकास अधिकारी श्री.हिरु ळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक शिवणकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी निलेश भूते, बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी नीरज कायरकर, कॅनरा बँकच्या व्यवस्थापक पुजा वर्मा, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, सत्य सामाजिक संस्थेचे देवेंद्र गणवीर, नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष साजीदा बेगम सिध्दीकी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, देवरीसारख्या मागास, दुर्गम, आदिवासी बहुल तालुक्यातील चांदलमेटा या आडवळणाच्या गावातील वंदना उईके ही आदिवासी महिला माविमच्या माध्यमातूनच थायलंड व रोमला जावून आली. इतर महिलांना त्यामुळे प्रेरणा मिळण्यास मदत झाली आहे. बचतगटांच्या महिलांना प्रगतीकडे नेण्यासाठी विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून बचतगटांच्या महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, महिला आता अबला राहिल्या नसून त्या सबला झाल्या आहेत. महिलांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेवून त्या योजनांचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक उन्नती करावी, असे मत व्यक्त केले. मुकाअ ठाकरे यांनी, माविममुळे बचतगटातील महिलांच्या सक्षमीकरणाला चांगला हातभार लागला आहे. बचतगटातील काही महिला पशूसखी, मत्स्यसथी, कृषीसखी तर काही महिला इंटरनेट साथी म्हणून चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. माविमने जिल्ह्यात बचतगटांकरीता पोषक वातावरण तयार केले आहे. बचतगटातील महिलांना चांगला फायदा होईल अशाच प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे असे मत व्यक्त केले.
शहारे यांनी, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आता समाधान होत असून आता त्या आर्थिक उन्नतीकडे जात असल्याचे मत व्यक्त केले. संचालन सविता तिडके यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी मांडले. आभार वालदे यांनी मानले.
मेळाव्यासाठी नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र व्यवस्थापक हेमलता वालदे, लेखापाल लवकुश शर्मा, उपजिविका सहयोगिनी गीता नांदगाये, सुनीता भैसारे, सुशीला कुरसूंगे, साधन समुदाय गटाच्या कल्पना जांभूळकर, प्रमिला मोहबे, वासना टेंभूर्णीकर यांनी सहकार्य केले.

महिलांचा केला सत्कार
बँक आॅफ इंडिया शाखेच्यावतीने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत शिशु गटात कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्र प्रमिला मोहते, अवंता काथाडे, जनन मरस्कोल्हे, कुंती मेश्राम, प्रमिला राऊत, छाया मडावी यांना देण्यात आले. या महिलांना प्रत्येकी ५० हजार रु पयांचे कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे. देवरी तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत चांदलमेटा येथील बचतगटाच्या वंदना उईके या थायलंड व रोम येथे नूकत्याच जावून आल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार, १०० टक्के शौचालय ग्रामसंस्था वनश्री ग्रामसंस्था चिचेवाडा व शारदा ग्राम संस्था जेठभावडा, ५ लाख रु पये कर्ज घेवून आर्थिक व्यवसायामध्ये वाढ केल्याबद्दल माऊली महिला बचतगट देवरी, ४ लाख रु पये कर्ज घेवून आर्थिक व्यवसायामध्ये वाढ केल्याबद्दल लक्ष्मी महिला बचतगट देवरी, अन्नपूर्णा महिला बचतगट हरदोली, उत्कृष्ट पशूसखी म्हणून मासूलकसा येथील दिलेश्वरी बंसोड, उद्योजक तथागत महिला बचतगट चारभाटा, उद्योजक म्हणून सदगुरु महिला बचतगट फुटाणा येथील वंदना लाडे, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणन वासना टेंभूर्णीकर, उत्कृष्ट सहयोगीनी म्हणून अस्मीता भैसारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Banks should make women self-reliant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.