बंदी असलेले ई-रिक्षा धावतात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:21 AM2017-10-23T00:21:25+5:302017-10-23T00:22:08+5:30
महाराष्टÑातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा गोंदियात सर्रास चालविले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्टÑातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा गोंदियात सर्रास चालविले जात आहे. बंदी असलेल्या या वाहनांना जिल्ह्यातील रस्त्यांवर धावताना परिवहन विभागाच्या अधिकाºयांना हे वाहन आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ५० ई-रिक्षा बिनधास्त धावत असल्याची माहिती आहे.
बॅटरीवर चालणारे ई-रिक्षा दिल्लीतील प्रकरणाने गाजले. त्यानंतरही महाराष्टÑात या ई-रिक्षाला बंदी होती. त्यानंतर प्रायोगीक तत्वावर नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती या ठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात आले.
परंतु हे ठिकाण वगळले तर अख्या महाराष्टÑात ई-रिक्षाला बंदी असताना गोंदिया व तिरोडा येथे ई-रिक्षा विक्रीची दुकाने थाटून हे वाहन विक्री केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला ५० ई-रिक्षा धावत असल्याची माहिती परिवहन विभागामार्फत मिळाली.
महाराष्टÑ शासनाची या ई-रिक्षांना मंजूरी नाही. त्यांची नोंदणी झाली नाही. तरिही क्रमांक नसताना रस्त्यावर बिनधास्तपणे हे वाहन चालविले जात आहे. या वाहनचालकांनी अपघात करून वाहन पळवून नेले तर त्यांना शोधणे अत्यंत कठिण होणार आहे. अनधिकृतपणे हे रिक्षा गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांवर बिनधास्तपणे धावत आहेत. यावर कारवाई होणार आहे.
तसेच रस्त्यावर विनाक्रमांक धावणाºया गोंदियात एक तर तिरोड्यात दुसरा ई-रिक्षा जप्त करण्यात आले आहे. आता आणखी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
परिवहन विभागाची पोलिसांत तक्रार
बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात धावत असल्याने दोन ई-रिक्षांवर कारवाई करून एक वाहन तिरोडा पोलीस ठाण्यात तर दुसरे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या त्या वाहनांना सोडण्यासाठी नागपूर येथून परिवहन विभागाचे कर्मचारी मांडवेकर यांना मंगळवारी फोन आला होता. ते वाहन न सोडल्यास तुम्हाला व तुमच्या अधिकाºयांना ठार करू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार परिवहन विभागाने शहर पाोलिसांकडे केली आहे.