बापरे...गोंदिया जिल्ह्यात २८ हजार नागरिकांनी केले नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:30 PM2020-10-03T12:30:31+5:302020-10-03T12:33:41+5:30
Gondia News Corona mask मागील सहा महिन्यात गोंदिया जिल्ह्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासन आणि प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, गर्दी टाळणे, निर्धारित वेळेत दुकाने सुरू ठेवणे यासाठी नियम तयार केले होते.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यातंर्गत मागील सहा महिन्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतर काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर न करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदीचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मागील सहा महिन्यात या विरोधात धडक मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ हजार ९०० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर १४८ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. कोविड संसर्गाच्या काळात दंडत्मक कारवाईतून प्रशासनाला सुध्दा चांगला महसूल प्राप्त झाला आहे.
आठ दिवसात ७६४ जणांवर कारवाई
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ उंचावल्याने नियम अधिक कठोर करीत राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले. यातंर्गत मागील आठ दिवसांच्या कालावधी ७६४ जणांवर कारवाई करुन ३ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर व्यावसायीक प्रतिष्ठाने आणि बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ११ हजार ७५ जणांवर कारवाई करुन ११ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोविडची माहिती लपविणे पडले महागात
कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची आरोग्य विभाग आणि नगर परिषदेला माहिती देणे अनिवार्य आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी सुध्दा याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र बरेच रुग्ण याची माहिती देत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा माहिती लपविणाऱ्या ८० रुग्णांना प्रशासनाने नोटीस बजावून १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून यापैकी ४ जणांनी दंडाची रक्कम भरली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली.