रेल्वे स्थानकालाही पुजारीटोलाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:39 PM2019-05-25T22:39:43+5:302019-05-25T22:40:04+5:30
येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती. यावर मात करण्यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाने रेल्वे प्रशासनाच्या मागणीवरुन पुजारीटोला धरणाचे १०० दलघमी पाणी बाघ नदीच्या पात्रात शुक्रवारी (दि.२४) सोडले. त्यामुळे काही दिवस तरी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही.
गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीला बिरसोली येथील बाघ नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले. परिणामी रेल्वे स्थानक आणि कर्मचारी वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. बाघ नदीत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीने तळ गाठल्याने चार दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता. ही समस्या ओळखत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मल्लिकाअर्जुन राव यांनी जिल्हाधिकारी आणि बाघ सिंचन प्रकल्पाला पत्र लिहून बाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर बाघ सिंचन प्रकल्प विभागाने बुधवारी (दि.२२) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडले. मात्र हे पाणी रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत बाघ नदीच्या पात्रात पोहचणार असल्याची माहिती संबधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने केवळ १०० दलघमी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गरजेच्या तुलनेत सोडण्यात आलेले पाणी फार कमी असून पुन्हा पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती आहे.
देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सिरपूरबांध जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. त्याचीच दखल घेत सिरपूर जलाशयातून पाणी सोडण्यात आले. यासाठी या जलाशयाचे दोन गेट उघडण्यात आले होते. जवळपास २७० दलघमी मिटर पाणी या जलाशयातून सोडण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जलाशयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले.
गरज भासल्यास पुन्हा सोडणार पाणी
मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे केवळ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले. विशेष म्हणजे सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची अंतीम मुदत ही २० मे पर्यंत असते. मात्र यंदा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्याची मुदत संपली असली तरी गरज भासल्यास पुन्हा पाणी सोडण्यात येईल असे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.