केवळ घोषणांचाच आधार ; निराधारांना एक हजाराची मदत केव्हा मिळणार? (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:35+5:302021-05-08T04:30:35+5:30
गोंदिया: ज्यांचा घरातील कमविता आधारच गेला त्या निराधारांना जगण्यासाठी थोडी मदत म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी ...
गोंदिया: ज्यांचा घरातील कमविता आधारच गेला त्या निराधारांना जगण्यासाठी थोडी मदत म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, अपंगांसाठी अशा विविध योजना अंमलात आणल्या. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यात १ लाख १९ हजार ७४५ लाभार्थी लाभ घेत आहेत. कोरोना संकट असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने संचारबंदी घोषित केली आहे. या संचारबंदीत तळहातावर कमवून खाणाऱ्यांपासून तर निराधारांना ५०० कोटी पेक्षा अधिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. परंतु गोंदिया जिल्ह्यातील एकाही निराधारांना ही मदत अद्याप मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेली केवळ घोषणाच आहे का? मदत मिळणार किंवा नाही या विवंचनेत निराधार, वृध्द, अपंग आहेत.
........
संजय गांधी निराधार योजना- ३१८५०
श्रावणबाळ निराधार योजना- ५७१२५
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना- २६६१२
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना- ३८३१
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना- ३२७
.........
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
- कोरोनाची दुसरी लाट आल्याने अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली. पहिल्या लाटेतील मृत्यूचे प्रमाण कमी होते परंतु दुसऱ्या लाटेने शेकडो लोकांचे जीव गेले.
- गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तिसरी लाट तोंडावर येऊन ठेपली असताना निराधारांना आधाराची गरज आहे.
.........
प्रतिक्रिया
कोरोनामुळे आम्हाला घराबाहेर निघता येत नाही. शासनाने संचारबंदी करीत असतांना १ हजार रूपये निराधारांना, वृद्धांना अपंगांना देत असल्याचे सांगितले मात्र शासनाची मदत मिळाली नाही.
- बळवंतराव मेंढे, खातिया.
...............
शासनाने संचारबंदीमुळे एक हजाराची मदत जाहीर केल्याची वार्ता कानावर आली. परंतु मदत केल्याचे पैसे आमच्या खात्यात आलेच नाही. शासन कधी मदत करते याकडे लक्ष आहे.
-मीराबाई हुकरे, पदमपूर.
............................
पहिल्या लाटेत आधी मदत केल्यानंतरच लॉकडाऊन करण्यात आले. परंतु महाराष्ट्र शासनाने केवळ मदतीची घोषणा करून लॉकडाऊनचा महिना काढूनही मदत केली नाही. आम्हाला मदतीची गरज आहे.
-हिरामण दिवाळे, किडंगीपार
........................
शासनाने मदत देतो म्हणून घोषणा केली परंतु मदतीचे पैसे आमच्या खात्यात आले नाही. कोरोनाचे संकट उभे असतांना आम्हाला जगणे कठीण झाले आहे. ना कुणाची मदत ना हाताला काम यामुळे काय करावे हे सुचत नाही.
-अनिता फाये, किडंगीपार
.......................
शासनाने मदत दिली किंवा नाही हे माहीतच नाही. कोरोनामुळे घराबाहेर पडू नका असे सांगण्यात आल्याने आम्ही घराबाहेर गेलो नाही. परंतु मदत न दिल्यामुळे पोट कसे भरावे हा प्रश्न उभा आहे. आधी मदत करूनच लॉकडाऊन करायला पाहिजे होता.
राधिका वाघाडे, पदमपूर