गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

By अंकुश गुंडावार | Published: November 8, 2024 07:56 AM2024-11-08T07:56:54+5:302024-11-08T07:57:56+5:30

Maharashtra Assembly Election 2024: गोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढाई अर्जुनी मोरगावमध्ये होत आहे. येथे चेहरे जरी बडोले व बन्सोड असले तरी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.

battle of prestige for Nana patole & Praful Patel, who will take over the fortress! | गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

- अंकुश गुंडावार
गोंदिया :  जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढाई अर्जुनी मोरगावमध्ये होत आहे. महायुतीतील अजित पवार गटाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापून भाजपचे माजी आ. राजकुमार बडोले यांना पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतील काँग्रेसने येथे स्थानिक उमेदवार डावलून मतदारसंघाबाहेरील माजी आमदार दिलीप बन्सोड यांना उमेदवारी दिली.

येथे चेहरे जरी बडोले व बन्सोड असले तरी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे हा गड कोण सर करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. काँग्रेसने दिलीप बन्सोड यांना उमेदवारी दिल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेसला यश आले असले तरी स्थानिकांच्या नाराजीची कुरबूर आहेच. दुसरीकडे मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुलगा सुगत यांना प्रहारकडून रिंगणात उतरविले आहे. ते किती मतविभाजन करतात, हे पाहावे लागेल. महायुतीमुळे बडोले यांची ताकद वाढली असली तरी ऐनवेळी ‘नाना’ तऱ्हा काय चमत्कार घडवितात ते महत्त्वाचे ठरेल.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे
- हे सर्वाधिक धान उत्पादक क्षेत्र. मात्र धानावर प्रक्रिया उद्योगाचा येथे अभाव आहे. परिणामी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल. 
- एमआयडीसीसाठी जागा आरक्षित मात्र उद्योगांची वानवा. बेरोजगारीची समस्यामोठी. येथे उद्योगांची स्थापना केल्यास रोजगार निर्मितीस मदत होईल. 
या मतदारसंघात मोठे सिंचन प्रकल्प आहेत, पण त्यावर मत्स्य व्यवसाय विकसित करण्याकडे दुर्लक्ष.
- कृषी महाविद्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाही. कृषी तंत्रज्ञानापासून तरुण वर्ग दूर.
- नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसर लाभला असला तरी पर्यटनांचा दृष्टीकोनातून या परिसराचा विकास अद्याप झालेला नाही.  

Web Title: battle of prestige for Nana patole & Praful Patel, who will take over the fortress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.