सावधान ! मलेरिया, डेंग्यू पसरतोय पाय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 05:00 AM2021-09-03T05:00:00+5:302021-09-03T05:00:02+5:30
जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातसुद्धा मागील आठवडाभरापासून मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत मलेरियाच्या ३६७, तर डेंग्यूच्या १२१ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोन्ही आजाराच्या प्रत्येकी एका रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदल आणि डासांचा प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होत उपाययोजना करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातसुद्धा मागील आठवडाभरापासून मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या भागात शिबिर लावून नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आशा आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या परिसरात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. तसेच डासनाशक फवारणीसुद्धा सुरू केली आहे. छोटा गोंदिया येथील एका रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.
ही आहेत मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे
- खूप थंडी वाजून ताप येणे
- उलटी होणे, मळमळ वाटणे
- तर डेंग्यूमध्ये, डोळे व डोके दुखणे,
- कंबर दुखणे, गरगरल्या सारखे होणे
अंगावर ताप काढू नका
- वातावरणातील बदलामुळे वायरल फीवरच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तर काही भागात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप राहिल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून उपचार घ्या. कुठलाही ताप अंगावर काढू नका.
..ही घ्या काळजी
- आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा
- आठवड्यातून एक दिवस कोरोडा दिवस पाळा
- नियमित मच्छरदाणीचा वापर करा
- आपण वास्तव्य करीत असलेल्या परिसरात पाणी साचू देऊ नका
- तीन-चार दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असल्यास त्वरित जवळच्या डाॅक्टरांशी संपर्क साधा.
मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य शिबिर तसेच आशासेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच डासनाशक फवारणीसुद्धा सुरू करण्यात आली आहे.
- डॉ. वेदप्रकाश चौरागडे,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी