सावधान! रुग्ण संख्येत होतेय पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:01+5:302021-03-04T04:56:01+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि. ३) जिल्ह्यात २४ बाधितांची नोंद झाली तर ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि. ३) जिल्ह्यात २४ बाधितांची नोंद झाली तर ६ बाधितांनी कोरोनावर मात केली. गोंदिया तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहर आणि तालुकावासीयांनीसुद्धा थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा याकडे दुर्लक्ष करणे पुन्हा जिल्हावासीयांच्या जीवावर बेतू शकते.
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवस कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. तर चार तालुके कोरोनामुक्त होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र होते. मात्र बुधवारी जिल्ह्यात २४ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो. बुधवारी आढळलेल्या २४ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १६ बाधित गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४, आमगाव १ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७१,४२७ बाधितांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५९,६२५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६८,७७९ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२,५६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,४८० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४,१३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १५९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
..........
जिल्हावासीयांनो, कोरोनाकडे दुर्लक्ष नको!
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे समजून अनेक जण कोरोना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्हावासीयांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.